येवला व्यापारी असोसिएशन दोन दिवसांपूर्वी हमाली, तोलाई शेतकऱ्यांच्याकडून कपात केली जाणार नसल्याचा निर्णय घेतला. यानंतर आता मनमाड बाजार समितीत आज व्यापाऱ्यांची बैठक झाली. मात्र यावर तोडगा निघू शकलेला नाही. परिणामी आज आणि उद्या मनमाड बाजार समितीत बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
नाशिक जिल्हा हा शेतमालाचे आगार समजले जातो. यातही कांदा ही मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडते. यात असंख्य लोकांची भूमिका असते. यातील व्यापारी वर्गाने दोन दिवसांपूर्वी येवला अंदरसूल बाजार समितीत कांदा व भुसार शेतीमालाचे व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याच्या पट्टीतून केल्या जाणाऱ्या दोन टक्के हमाली आणि तोलाई कपातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार ०१ एप्रिलपासून कोणत्याही शेतकऱ्यांकडून कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अगदी याच पार्श्वभूमीवर आज मनमाड बाजार समितीत व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र यावर एकमत झाले नसल्याचे दिसून आले. मनमाड बाजार समितीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की, शेतकरी वर्गाचे हिशोबपट्टीतुन हमाली तोलाई व वाराई कपाती संदर्भात व्यापारी वर्ग व हमाल मापारी प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने, यामुळे बाजार समितीचे लिलाव प्रकियेत अडथळा निर्माण होऊ नये, शेतकरी बांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून गुरुवार दि. 04 एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत मनमाड बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज बंद राहतील. याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
उन्हाळ कांद्याची आवक
एकीकडे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. दुसरीकडे बाजार समितीमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडणार आहे. व्यापारी वर्गाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांची सुटका करावी, असे सांगण्यात येत आहे. एकीकडे कांद्याला भाव मिळत नसताना दुसरीकडे बाजार समिती बंद ठेऊ नये, असे आवाहन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.