नाशिक : लेव्ही संदर्भात प्रश्न पेटल्याने २५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होते. व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे कांदा व इतर शेतीमालाचे लिलाव बंद होते. सहकार विभागाने व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्यानंतरही व्यापारी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सर्वच स्तरावर ओरड झाल्याने व्यापाऱ्यांनी अखेरीस बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील तेराहून अधिक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया सुरु झाली आहे.
नाशिकच्या बाजार समित्यांमधील लेव्हीचा तिढा कायम असून मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी १३ बाजार समित्या व उप बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले. नांदगाव, मनमाड वगळता इतर बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची विक्री सुरू झाल्याची माहिती सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, नोंदणीकृत २७०० हमाल मापारी कामगारांना व्यापाऱ्यांनी कामावर घेतला नसल्याचा दावा राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जिल्हा सेक्रेटरी सुनील यादव यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी बाहेरचे कामगार बोलवून लिलाव सुरू केल्याची टीका त्यांनी केली आहे. मात्र नाशिक, लासलगाव, विंचूर, निफाड, सिन्नर, नांदूर, सटाणा, दिंडोरी, वाणी, उमराणे, देवळा, चांदवड, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यामध्ये लिलाव सुरु झाल्याने कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. सकाळपासून बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन आलेले ट्रॅक्टर लिलावासाठी रांगेत उभे होते.
'शेतकऱ्यांच्या लिलावाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल निश्चितच समाधान आहे. माथाडी कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ न देता त्याबाबत संचालक मंडळाच्या समन्वयाने व खात्याच्या सूचनेप्रमाणे योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी वेळप्रसंगी इतर उपबाजार आवारांप्रमाणे कांदा गोणी लिलावाचा अवलंब देखील करण्यात येईल.'
- शशिकांत गाडे, सभापती, सिन्नर बाजार समिती
असे ठरल्याने झाले लिलाव...
बाजार समितीने व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांना लेखी पत्र दिले. त्यात सिन्नर व नायगाव आवारात हमाली, तोलाई व वाराई ही हिशोब पट्टीत कपात न करता दे-ब्रिज स्लीपवरील वजन व नंबर हिशोब पट्टीवर टाकून हिशोब पट्टी तवार करावी व कांदा लिलाव सुरू करण्यात यावे, असे लेखी पत्र दिले.
राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनशी संलग्न असलेल्या जिल्ह्यातील २७०० अधिकृत हमाल मापारींना कामावर घेण्यात आले नाही. येवला, पिंपळगाव येथील कामगार फक्त कामावर होते. कारण प्रचलित पद्धतीनेच शेतीमालाची विक्री सुरू करून तोलाई हमाली कापण्याचा निर्णय तेथील व्यापाऱ्यांनी घेतला. आमच्याही कामगारांना कामावर घ्यावे, तसेच व्यापाऱ्यांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कामकाज करावे.
- सुनील यादव, सेक्रेटरी, माथाडीं ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन
सकाळचे बाजारभाव
आज सकाळी लासलगाव - विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 1375 रुपये तर चांदवड बाजार समितीत 1350 रुपये दर मिळाला. तसेच मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1450 रुपये दर मिळाला. पुणे -पिंपरी बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला.