केंद्र सरकारने पुन्हा एकदा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये याचे पडसाद उमटत असून आजपासून जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तर लासलगाव बाजार समितीचा उपबजार असलेल्या विंचूर बाजार समितीत कांदा लिलाव सुरळीत सुरू असून काही संघटनांनी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.
सध्या शेतकरी अतिशय बिकट अवस्थेतून वाटचाल करत आहे. अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला, उत्पादनही कमी झाले. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यात कांद्याला देखील मोठा तडाखा बसला. आता कुठे कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असताना केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप शेतकरी व्यापारी संघटनांकडून केला जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी व्यापारी संघटना आणि रस्त्यावर उतरत आंदोलने केली. त्यानंतर आजपासून जिल्ह्यातील 15 बाजार समित्या मध्ये बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे. एकूणच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कोंडी होणार असल्याचे चित्र आहे.
कांद्यावर पुन्हा एकदा निर्यातबंदी लागू केल्याच्या निषेधार्थ आज पासून नाशिक जिल्ह्यातले सर्वच बाजार समित्यांमधले कांद्याचे लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलने केली असून अनेक ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद पाडलेले होते आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासोबतच केंद्राने ज्या पद्धतीने अचानकपणे ही निर्यात बंदी लादलेली आहे. त्या विरोधामध्ये हे सगळे नाशिक जिल्ह्यातले कांदा व्यापारी आता एकवटलेले आहेत आणि जोपर्यंत केंद्र सरकार निर्यात बंदी हटवत नाही, तोपर्यंत एकाही बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होणार नाही अशा पद्धतीची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे. तर कांदा लिलाव बंद झाल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे.
विंचुरला कांदा लिलाव चालू
दरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आजपासून जिल्ह्यातील 15 बाजारसमित्या बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. दुसरीकडे लासलगाव बाजारसमितीची उपबाजार समिती असलेल्या विंचूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु आहे. शिवाय शेतकऱ्यांचा देखील चांगला प्रतिसाद असल्याचे बाजार समिती सचिवांनी सांगितले. आज या ठिकाणी लाल कांद्याला कमीत कमी 2600 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 3000 रुपये भाव मिळाला. तर लाल कांद्याला सरासरी 3200 ते 3300 रुपये भाव मिळाल्याचे सचिवांनी सांगितले. तर याच सुमारास शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बाजार आवारात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवेदन देऊन हे आंदोलन बंद करण्यात आले.