Join us

Onion Market : अखेर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:16 AM

अखेर आठ दिवसांनंतर आजपासून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाले

नाशिक : अखेर आजपासून लासलगाव बाजार समितीत कांदा  लिलाव सुरु झाले असून आज उन्हाळ कांद्याला सरासरी 1550 रुपये दर मिळाला आहे. तर दोन आठवड्यानंतर कांदा लिलाव सुरू झाले म्हणून एका वाहनातील कांद्याला 2900 रुपये हा दर मिळाला आहे. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांचा कांदा लिलावात सहभाग नसल्याचे पाहायला मिळाले. ..

गेल्या आठवडाभरापासून हमाली मापारी प्रश्नी लासलगाव बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद होती. लेव्हीप्रश्र्नी व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे मागील आठ दिवसांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झालेले होते. आज अखेर लासलगाव बाजार समितीचे लिलाव सुरू झाले. मात्र या लिलावात स्थानिक बाजार समितीतील व्यापारी यांनी सहभाग घेतला नाही, मात्र नवीन परवानेधारक व विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी यांनी लिलावात सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले. आज उन्हाळ कांद्याला सरासरी १५०० रुपयांचा भाव आज बाजार समितीत मिळाला.

एकीकडे बाजार समित्या बंद असल्याने शेतकरी संघटनाच्या माध्यमातून कांदा विक्री केंद्र सुरु करण्यात आले होते. दोन  विक्री केंद्राच्या माध्यमातून लिलाव झाले. मात्र काल पुन्हा लासलगाव बाजार समितीत बैठक झाल्यानंतर कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय झाला. या लिलावात व्यापारी सहभागी न झाल्यास परवाने रद्द करण्याचा  जिल्हा उपनिबंधकानी दिला होता. मात्र तरीदेखील आजपासून सुरु झालेल्या कांदा लिलावात व्यापारी सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. मात्र बाजार समितीत कांदा लिलाव सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

दरवर्षी अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांनी कांदा मार्केट बंद राहतात. यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा काहीही संबंध नसतो. शेतकऱ्यांचा मुख्य मुद्दा फक्त कांद्याला जास्तीत जास्त दर मिळणे हाच आहे. इतक्या दिवस बाजार समित्या बंद राहील्या याला सभापती, सचिव, संचालक, मंडळ हमाल, मापारी, व्यापारी, जिल्हाधिकारी, कामगार उपायुक्त, जिल्हा उपनिबंधक हेच जबाबदार आहे. नुकसान मात्र शेतकऱ्यांना सोसावे लागते. 

- भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना 

टॅग्स :कांदाशेतीमार्केट यार्डनाशिक