Join us

कांदा लिलाव सुरु, आजच्या बाजारभावाकडे लक्ष 

By गोकुळ पवार | Published: December 11, 2023 11:40 AM

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या सुरु करण्याचा निर्णय स्थानिक बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.

कांदा निर्यातशुल्कावरून शेतकरी व्यापारी वर्ग चांगलाचा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यतंरी बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे कांदा लिलाव देखील ठप्प होते. मात्र आजपासून पुन्हा नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या सुरु करण्याचा निर्णय स्थानिक बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांदा लिलाव सुरु झाले असून आजचा बाजारभाव काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्नाने वातावरण तापल्याचे पाहायला मिळालं. कांदा निर्यात बंदीला स्थगिती द्यावी या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले. मात्र दरवेळी शेतकऱ्यांनाच मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळालं. मात्र हेच नुकसान टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील विंचूर, मनमाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत आदींचे इतर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

एकीकडे एक-दोन दिवस बाजार समित्या बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. शिवाय बाजारभावही घसरले. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असताना केंद्र सरकारने पुन्हा एकदा निर्यात बंदीचे हत्यार उपसल्याने शेतकऱ्यांची वाताहत झाली. मात्र ही वाताहत थांबवण्यासाठी आजपासून लासलगाव बाजार समितीसह विंचूर, मनमाड, पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आज शेतकरी कांदा घेऊन बाजार समितीत दाखल होत आहेत. मात्र आज कांद्याला काय भाव मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण निर्यातबंदीनंतर तब्बल नऊशे ते हजार रुपयांनी कांदा घसरला. त्यानंतर बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे आजच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लासलगाव बाजारसमिताकडून आवाहन 

दरम्यान लासलगाव बाजार समितीकडून शेतकरी बांधव, अडते, व्यापारी व इतर मार्केट घटकांना आवाहन करण्यात आले आहे. आज दुपारी 01 वाजता लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा या शेतीमालाचे लिलाव नियमितपणे सुरू होतील. शेतकरी बांधवानी आपला कांदा हा शेतीमाल प्रतवारी करुन विक्रीस आणावा, असेही सांगण्यात आले आहे. तर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे दिघोळे म्हणाले की, आजपासून बाजार समित्या सुरु झाल्या आहेत. शेतकरी येतील, आज कांद्याला काय बाजारभाव मिळतो, याकडे लक्ष आहे. आज काय दर येतो, हे बघावे लागेल. त्यानंतर भूमिका ठरवली जाईल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

टॅग्स :नाशिककांदाशेतीमार्केट यार्ड