- शरद झावरेअहमदनगर : कांदा-खरेदी विक्रीसह (onion Auction) शेतीमालाचे वजन व भाव याची माहिती शेतकरी, व्यापाऱ्यांना थेट मिळावी यासाठी 'बंतोष' या सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा निर्णय पारनेर बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) या संगणकीय प्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर करून पहिली डिजिटल बाजार समिती होण्याचा मान पारनेरला मिळणार आहे.
पारनेर बाजार समितीत (Parner Market Yard) खरेदी विक्री केंद्रात 'बंतोष सॉफ्टवेअर' या संगणकीकृत प्रणालीद्वारे सर्व खरेदी विक्री व्यवहारांची ऑनलाइन नोंद होणार आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांना संगणकीकृत पावत्या मिळणार आहेत. या सॉफ्टवेअर प्रणालीचा ३३ मापाडींच्या माध्यमातून वापर करण्याचा निर्णय घेतला आहेत्यामुळे शेतमालाला मिळालेला भाव, पट्टी याचा संदेश थेट बळीराजाच्या मोबाइलवर मिळणार आहे, अशी माहिती सभापती बाबासाहेब तरटे, उपसभापती बापूसाहेब शिर्के यांनी दिली..
'बंतोष' संगणकीय प्रणालीचे फायदे..'बंतोष' संगणकीय प्रणाली ही शेतकरी, मापाडी, आडतदार, व्यापारी, निर्यातदार, बाजार समिती कार्यालय, अशा सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण व फायदेशीर आहे. या प्रणालीद्वारे होणारी विविध पावत्यांची नोंद हे वैशिष्ट्य आहे. या पावत्या संबंधित घटकांना 'लॉगिन'वर केव्हाही पाहता येणार आहेत. शेतमाल खरेदी-विक्रीची माहिती थेट शेतकरी, व्यापाऱ्यांना मिळेल. बाजार समितीच्या कारभाराबद्दल व व्यापाऱ्यांबद्दल शेतकरी वर्गात विश्वासार्हता निर्माण होणार आहे.
लवकरच धान्य चाळणी यंत्रही कार्यान्वित..बाजार समितीच्यावतीने सुपा औद्योगिक वसाहतीत गोदामामध्ये धान्य चाळणी यंत्र (ग्रेडिंग) लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रकारचे अन्नधान्य शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना प्रतिकिलो प्रमाणे चाळून व ग्रेडिंग करून मिळणार आहे. खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
यंदा १७ लाख क्विंटल कांदा आवकबाजार समितीतून कांदा कर्नाटक, तामिळनाडू, बंगळुरू, गुजरात, उत्तर प्रदेशात जातो. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी १७ लाख क्विंटल कांदा आवक झाल्याची माहिती सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली. २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये ११ लाख ९० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांतून व्यापारीही कांदा खरेदीसाठी येथे येतात. त्यामुळे उलाढालीतून ३ कोटी १९ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती उपसभापती बापूसाहेब शिर्के यांनी दिली. बाजार समितीने १ कोटी ६० लाख रुपयांची मुदत ठेव पावती केल्याची माहिती सचिव सुरेश आढाव यांनी दिली. तसेच निघोज, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी येथे उपबाजार आहेत. भाळवणी-जामगाव रस्त्यावर बाजार समितीच्या मालकीचे १५ ते २० गाळे बंद अवस्थेत आहेत. व्यापाऱ्यांशी चर्चा करून भाळवणी उपबाजार समितीमध्ये कांदा, वाटाणा खरेदीचा निर्णय घेणार असल्याची सांगितले आहे.