नाशिक : कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका, निर्यातीवर (Onion Export) लादलेले ४० टक्के किमान निर्यात मूल्य आदी कारणांनी मलेशिया, इंडोनेशिया यासह इतर देशांतील कांद्याच्या बाजारपेठेवर भारताचा दबदबा मागील सहा महिन्यांत अधिक प्रमाणात कमी झाला असून मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून समुद्रमार्गे कांद्याची निर्यात ६० टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षी (२०२३) जुलै महिन्यात या बंदरातून ८९ हजार १७४.७६० मेट्रिक टन कांदा (Onion Market) विविध देशांमध्ये भारतातून रवाना झाला होता.
या वर्षाच्या जुलै महिन्यात केवळ २१ हजार ७६५.३२२ मेट्रिक टन कांदा समुद्रमार्गे विदेशात पोहोचला आहे. या एकाच महिन्यात तब्बल ६७ हजार ४०९.४०० मे.टन कांद्याची घट दिसून आली. ऑगस्ट महिन्यातही त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. याचा सर्वांत जास्त फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. देशाची कांदा निर्यात गतवर्षात १३ टक्क्यांनी घटली असल्याचे आकडे जून महिन्यात समोर आले होते. त्यानंतरही निर्यातीचा आलेख सातत्याने घसरत असल्याची बाब प्रकर्षाने जाणवते.
वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये कांदा निर्यातीतून ३८७४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले असले तरी कांदा निर्यातबंदीच्या धरसोडीमुळे कांदा निर्यातीला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने निर्यात शिथिलतेचा निर्णय घेतला. मात्र, आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली घसरण आणि निर्यात शुल्कवाढीमुळे भारतातून फारसा कांदा निर्यात झाला नाही. कांदा निर्यातीवर गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात आली होती. या निर्यातबंदीमुळे किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांचा विरोध सरकरला सहन करावा लागला. साधारण सहा ते सात वर्षांनंतर सर्वांत कमी कांद्याची निर्यात यंदा झाली.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना कांद्याने रडविले तरी देखील शेतकऱ्यांना समाधान देईल अशी ठोस भूमिका अद्यापही सरकारी पातळीवर घेतली जात नसल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विदेशात जाणारे कांद्याचे कंटेनर घटल्याने बंदराच्या उत्पन्नातही घट झाली आहे. त्याचा फायदा चीन, पाकिस्तान घेत असून या दोन देशांनी आपल्याकडील कांदा जास्तीत जास्त निर्यात करून फायदा घेणे सुरू केले आहे.
बांगलादेशकडील निर्यात सुरळीत
गेल्या चार ते पाच दिवसांपासून बांगलादेशला ट्रकद्वारे कांदा निर्यात सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती प्रमुख निर्यातदारांनी दिली. बांगलादेशला राजकीय अराजकता माजल्यावर सीमा सील असल्याने दोघा देशांच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडकून पडले होते. ३६ तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली अन् दोन दिवसांनी पुन्हा काही काळ ट्रक थांबले होते. मात्र, आता चार-पाच दिवसांपासून भारतातून दररोज ८० ट्रक कांदा भरून बांगलादेशला पोहोचत आहे. हा एक दिलासा कादा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे. दुसरीकडे समुद्रीमार्गे निर्यात मात्र घटली आहे.