नाशिक : एकीकडे गेल्या आठ दिवसांपासून लासलगावसह इतर महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. हमाली, तोलाईच्या प्रश्नाचा तिढा सुटत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत शेतकरी संघटना पुढे सरसावल्या असून आज बागलाण तालुक्यात कांदा विक्री केंद्र सुरु झाले असून काल लासलगाव मार्केट आवाराबाहेर देखील कांदा लिलाव सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे या कांदा विक्री केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे शेतकरी संघटनाच्या वतीने सांगण्यात आले.
दिवसेंदिवस कांद्याचा प्रश्न किचकट होत चालला असून यात सामान्य कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. एकीकडे कांदा निर्यात बंदी असल्याचा फटका शेतकरी सोसत असताना काही दिवसांपासून हमाली, मापारी आणि लेव्हीचा प्रश्न उद्भवला आहे. या प्रश्नामुळे थेट बाजार समित्यांच बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुढाकार घेत स्वतःच कांदा विक्री केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेत नव्या अध्यायाला सुरवात झाली आहे.
कुठे काय भाव मिळाला?
बागलाण तालुक्यातील शेतकरी संघटनेने आजपासून कांदा लिलाव केंद्र सुरु केले आहे. आज सकाळच्या सत्रात जवळपास 150 वाहने आली, म्हणजेच 4500 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1000 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला असून दुपार सत्रासाठी शंभर वाहने दाखल झाली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर कालच लासलगाव बाजार समिती बाहेर शेतकरी संघटेनच्या माध्यमातून कांदा विक्री केंद्र सुरु करण्यात आले. आज सकाळी या केंद्रावर २०० वाहनांचा लिलाव झाला. यावेळी सरासरी १००० ते १५०० पर्यंत बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता शेतकरी संघटनेने वर्तवली आहे. तर आज सायखेडा येथे कांदा व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून सायखेडा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर पर्यायी कांदा खरेदी केंद्र चालू केले आहे. सदर जागेवरया ठिकाणी सकाळ सत्रात 50 वाहनांची आवक झाली. उन्हाळ कांद्याला सरासरी 1475 रुपये दर मिळाला.
शेतकऱ्यांचा कांदा विक्री झाला पाहिजे...
शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे म्हणाले की, हमाली मापारीचा प्रश्नामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. एकीकडे उन्हाळ कांद्याची काढणी सुरु आहे. शेतीवर मजूर आहेत, या मजुरांची मजुरी, इतर खर्च शेतकऱ्यांना करावयाचा असल्याने कांदा विक्री करणे आवश्यक आहे. मात्र बाजार समित्या बंद असल्याने कांदा लिलाव कुठे करायचा? म्ह्णूनच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लासलगाव परिसरात कांदा विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. आजपासून बागलाण, सायखेडा, वणी, दिंडोरी, सटाणा आदी परिसरात शेतकरी-व्यापारी यांच्या माध्यमातून कांदा विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहेत.