नाशिक : आता रेल्वे वॅगनद्वारे Onion Transport By Railway Wagon) देशभरात कांद्याची वाहतूक केली जाणार आहे. याबाबत निर्णय व्यापारी आणि रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी व्यापाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून कांद्याच्या लोडिंगला प्रारंभ करण्याचे आश्वासन दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे वॅगनद्वारे कांदा देशभर (onion Transport) पाठविण्याबाबत नाशिकरोड स्थानकात रेल्वे प्रशासन आणि कांदा व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक शनिवारी झाली. मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद मालखेडे आणि भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला लासलगाव, मनमाड आणि अंकई येथील कांदा व्यापारी उपस्थित होते.
बैठकीत रेल्वेतून कांद्याच्या लोडिंग प्रक्रियेस प्रारंभ करणे यावर चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांनी येथे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून कांद्याच्या लोडिंगला प्रारंभ करण्याचे आश्वासन यावेळी दिले. रेल्वेतून देशभरात या आधीही कांदा पाठविण्यात आला होता. बांगलादेशाला नाशिकरोड व अन्य रेल्वे स्थानकातून कांदा निर्यात करण्यात आला होता. आता पुन्हा रेल्वेतून कांदा वाहतूक होणार असल्याने रोजगार निर्मितीबरोबरच रेल्वेला महसूल मिळणार आहे. कांदा व्यापारी व शेतकऱ्यांचाही लाभ होणार आहे.
वाणिज्य प्रबंधकांकडून आढावा
मुख्य वाणिज्य प्रबंधक अरविंद मालखेडे यांनी नाशिक, लासलगाव आणि कसबे सुकेणे रेल्वे स्थानकांची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. या निरीक्षणाद्वारे स्थानकांवरील आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. कांदा व इतर शेतीमाल रेल्वेने पाठविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली व यासाठी आवश्यक उपाय योजणार असल्याचे वाणिज्य प्रबंधकांनी सांगितले.