नाशिक : मनमाड, अनकाई रेल्वे स्थानकातून अनेक महिन्यांपासून बंद असलेली कांदा वाहतूक पुन्हा (Kanda Market) सुरू झाल्याने व्यापारी, कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र दुसरीकडे अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर मनमाड, अनकाई, नगरसूल स्थानकातून उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा, पंजाब या राज्यात कांदा वाहतूक ठप्प होती. ती पुन्हा सुरु झाली आहे.
रेल्वे मालधक्क्यावर काम करणारे हमाल, ट्रकचालक, कार्टीग एजंट व अन्य कामगार वर्गात चिंतेचे सावट होते. कांद्याची आवक (Kanda Aavak) वाढू लागल्याने गेल्या काही दिवसांपासून मनमाड, अनकाई, येवला, नगरसूल स्थानकातून कांद्याचे रेक सुरळीतपणे भरून जाऊ लागले आहेत. कांदा वाहून नेणारे रेक छोटे व मोठे अशा दोन प्रकारचे असतात. मोठ्या रेकमध्ये ४२ मालडबे, तर छोट्या रेकमध्ये २१ डबे असतात. प्रत्येक डब्यात चाळीस टन कांदा भरला जातो.
यासाठी शंभर ते सव्वाशे कामगारांची टोळी काम करत असते. व्यापाऱ्यांच्या खळ्यातून कांदा रेल्वे धक्क्यापर्यंत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रकद्वारे ही वाहतूक करण्यात येते. मनमाड अनकाई येथून सद्यस्थितीत आठवड्यातून दोन रेक रवाना होतात. येत्या काही दिवसात ही संख्या वाढून तीन चारपर्यंत जाऊ शकते. कांदा वाहतूक सुरू झाल्याने अनेकांच्या उपजीविकेची संधी पुन्हा सुरू झाली आहे.
किसान रेल्वेने जातो कांदा
मनमाड येथून दर शनिवारी बिहार येथे किसान रेल्वेमार्गे पाच ते सहा मालडब्यातून कांदा पाठविला जातो. कांद्याचे गाव अशी ओळख असलेल्या शहरातील कांदा वाहतूक पूर्ववत झाल्याने शहराच्या अर्थकारणास चालना मिळत आहे.
शेतकरी चिंतेत
एकीकडे कांदा वाहतूक सुरु झाल्याने व्यापारी आणि रेल्वे परिसरातील कामगारांना हायसे वाटले आहे. मात्र दुसरीकडे गेल्या दीड महिन्यापासून कांदा बाजारभावात सुधारणा नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला हजार ते बाराशे रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
कांदा वाहतूक सुरू झाल्याने रोजगाराच्या मोठ्या संथी शहरात उपलब्ध झाल्या आहेत. आगामी काळात कांदा वाहतूक वाढून कांदा देशभरात रवाना होईल, रेल्वे हे कांदा वाहतुकीचे सुरक्षित व स्वस्त माध्यम आहे.
- सुशील संकलेचा, कांदा वाहतूकदार