गोंदिया : केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडून दरवर्षी सर्वच पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ केली जाते. सन २०२४-२०२५ करिता धानाच्या हमीभावात ११७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) धानाला २३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे. गेल्या २० वर्षांत धानाच्या हमीभावात (Paddy MSP) केवळ १६३३ रुपयांनी वाढ झाली आहे. तर २० वर्षांत धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च २० ते २२ हजार रुपयांवर गेला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा हमीभाव फारच कमी असल्याने धानाची शेती करायची तरी कशी असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
धानाच्या शेतीचा (Paddy farming) खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मशागतीचा खर्च, खते, बियाणे यांच्या वाढत्या किमती, मजुरीचे वाढलेले दर, पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेली वाढ यामुळे धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च २० ते २२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर एकरी धानाचे उत्पादन हे १८ ते २० क्विंटल असून त्यातून खर्च जाता तीन चार हजार रुपये वाचतात.
एवढ्या खर्चात शेतकऱ्यांनी कुटुंबांसह वर्षभर केलेली मेहनत आणि वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा खर्च कसा भरून काढायचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी ध्यानाला 2183 रुपये हमीभाव होता. त्यात आता 117 रुपये भर पडल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना 2300 रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे पण उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा हमीभाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मग महाराष्ट्राला का नाही?
लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात धानाला 2500 ते 03 हजार रुपये हमीभाव दिला जातो. मग या राज्यांना जमले ते महाराष्ट्राला का नाही, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन-चार वर्षांपासून येथील सरकार दाणाला 2500 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देत आहे.
गेल्या वीस वर्षातील धानाचे हमीभाव
2003 -04 मध्ये 550 रुपये, 2004-05 मध्ये 560 रुपये, 2005-6 मध्ये 570 रुपये, 2006-07 मध्ये 580 रुपये, 2007-08 मध्ये 645 रुपये, 2008-09 मध्ये 850 रुपये, 2009-10 मध्ये 950 रुपये, 2010-11 मध्ये 1000 रुपये, 2011-12 मध्ये 1080 रुपये, 2012-13 मध्ये 1250 रुपये, 2013-14 मध्ये 1310 रुपये, 2014-15 मध्ये 1360 रुपये, 2015-16 मध्ये 1410 रुपये, 2016-17 मध्ये 1470 रुपये, 2017-18 मध्ये 1550 रुपये, 2018-19 मध्ये 1750 रुपये, 2019-20 मध्ये 1815 रुपये, 2020-21 मध्ये 868 रुपये, 2021-22 मध्ये 1940 रुपये, 2022-23 मध्ये 2040 रुपये, 2023-24 मध्ये 2183 रुपये तर यंदा म्हणजेच 2024-25 मध्ये 2300 रुपयांचा हमीभाव ठरवण्यात आला आहे.