Join us

Bangladesh Export : संत्रा निर्यात मंदावली, बांग्लादेशमधील अराजकता शेतकऱ्यांच्या जीवावर, वाचा सविस्तर 

By सुनील चरपे | Published: August 16, 2024 6:57 PM

Orange Export Issue : बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कमध्ये माेठी वाढ केल्याने निर्यात आधीच मंदावली आहे.

- सुनील चरपे

नागपूर : अंबिया बहाराच्या संत्रा बाजारात (Orange Festival) यायला दीड महिना शिल्लक आहे. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कमध्ये (Import Duty) माेठी वाढ केल्याने निर्यात आधीच मंदावली आहे. त्यात तिथे निर्माण झालेल्या अराजकतेमुळे ही निर्यात पूर्णपणे थांबणार आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ही समस्या साेडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन तातडीने याेग्य उपाययाेजना करणे गरजेचे आहे.

बांगलादेश त्यांना लागणारा किमान ७२ टक्के शेतमाल भारताकडून आयात करताे. यात धान्य, भाजीपाला व फळांचा समावेश आहे. अराजकतेमुळे बांगलादेशने त्यांच्या सीमा सील केल्या असल्या, तरी ते अत्यावश्यक वस्तूंची भारताकडून आयात करीत आहे. सध्या भारतातून बांगलादेशात राेज ५० ते ६० ट्रक भाजीपाला, कांदा, धान्य व इतर अत्यावश्यक शेतमाल निर्यात केला जात आहे.

बांगलादेशातील ज्या आयातदारांकडे त्यांच्या बँकांचे ‘लेटर ऑफ क्रेडिट’ (एलसी) आहे, तेच भारताकडून शेतमाल आयात करीत आहेत. ‘एलसी’ असलेल्या आयातदार अथवा व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे. काही व्यापारी आणि बँकांनी आता ‘एलसी’चे प्रमाण वाढवायला सुरुवात केली आहे. यात व्यापाऱ्यांना अधी त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर बँकेचे ‘एलसी’ भारतीय व्यापाऱ्यांना पाठवून बांगलादेशाला शेतमाल खरेदी करावा लागताे.

‘पेमेंट’ची शाश्वती काेण घेणार?संत्रा खरेदी-विक्री व्यवहार ‘एलसी’द्वारे हाेत नव्हता, अशी माहिती संत्रा निर्यातदारांनी दिली. अराजकतेमुळे वेळीच पेमेंट मिळण्याची शाश्वती कमी असल्याने सध्या बांगलादेशात संत्राची निर्यात करणे धाेकादायक आहे. संत्रा निर्यातीला दीड महिना वेळ आहे. या काळात तेथील परिस्थिती सामान्य व्हायला पाहिजे. तेथील परिस्थिती दीड महिन्यानंतरही कायम राहिली तर संत्रा निर्यात करणे अशक्य आहे, अशी माहिती निर्यातदारांनी दिली.

केंद्र सरकारने पुढाकार घ्यावासंत्रा जर निर्यात झाला नाही तर आवक वाढेल आणि मागणी स्थिर राहिल्याने दर काेसळतील. त्यामुळे संत्रा उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान हाेईल. ही बाब टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालय, परराष्ट्र व्यापार मंत्रालय आणि अपेडाने पुढाकार घेणे आणि शिल्लक राहणाऱ्या किमान दाेन लाख टन संत्र्याच्या विक्रीचे तातडीने नियाेजन करणे आवश्यक आहे. हे नियाेजन करण्यासाठी त्यांच्याकडे किमान ४५ दिवस आहेत.

आयात शुल्कामुळे निर्यात घटलीदेशातील संत्रा उत्पादनात १५.७६ टक्के वाटा उचलत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ष २०१९-२० पर्यंत सरासरी २.२५ लाख टन नागपुरी संत्रा बांगलादेशात निर्यात केला जायचा. बांगलादेशने ऑक्टाेबर २०२१ मध्ये संत्र्यावर २० टका (२४.२९ रुपये) प्रतिकिलाे आयात शुल्क लावले. यात मागील पाच वर्षांत सातत्याने वाढ केली असून, वर्ष २०२४-२५ च्या हंगामासाठी हा आयात शुल्क १०१ टका (७२.२८ रुपये) प्रतिकिलाे करण्यात आला आहे. त्यामुळे संत्र्याची निर्यात ६० ते ६३ हजार टनांपर्यंत घटली आहे.

टॅग्स :बांगलादेशशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड