आयुर्वेदिक गुणांमुळे वेगळेपण असणारी पानपिंपरी नेहमी 400 रुपये किलो दराने विकली जाते. यंदा मात्र काढणी काळात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व वातावरणातील आर्द्रता यामुळे पानपिंपरीवर बुरशीचा अटॅक झाला. त्यामुळे उत्पादकांच्या हातातोंडचा घास हिरावला गेला आहे. 400 रुपये किलोप्रमाणे मागणी असताना 200 रुपये किलोने विकली जात असल्याचे वास्तव आहे.
कफसायरपसह अन्य आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जात असलेल्या पानपिंपरीचे उत्पादन अमरावती जिल्ह्यातील काही भागात प्रामुख्याने घेतले जाते. जून महिन्यात याची लागवड केली जाते व एकरभरात साधारणपणे ७ क्विंटलपर्यंत उत्पादन होते. या पिकाचा उत्पादनखर्च देखील एकरी तीन ते साडेतीन लाखांच्या घरात आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चदेखील निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे, अशी उत्पादकांची मागणी आहे. पानपिंपरीचा दिवाळीनंतर काढणीचा हंगाम सुरू होतो. यंदा 25 नोव्हेंबरपासून आठवडाभर अवकाळीची रिपरिप सुरू होती.
याशिवाय ढगाळ वातावरणदेखील बाधक ठरले आहे. त्यामुळे पानपिंपरीवर बुरशीचा अटॅक झाला. ही बुरशी लागलेली पानपिपरी झाडावरून गळून पडत आहे. याशिवाय ज्या उत्पादकांनी तोड केली होती, ती सुकवत असताना अवकाळीने भिजली, त्यामुळे देखील बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या प्रकारात प्रतवारी खराब झाल्याने पानपिंपरीला एजंट, व्यापारी कमी भावाने मागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभराचे हे पीक असल्याने एका हंगामावरच पुढील नियोजन असते. मात्र अशा स्थितीत शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे.
पीक विम्यात अधिसूचित नसल्याचाही फटका
अंजनगाव सुर्जी ते अकोला या पट्ट्यात अनेक शेतकरी पानपिपरीची लागवड करतात. आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या पानपिपरीचा पीक विमा योजनेच्या अधिसूचित पिकात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी त्यांना परतावा मिळत नाही, शासनाद्वारा अनुदानही मिळत नसल्याची खंत उत्पादकांनी व्यक्त केली. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, आद्रता यामुळे पानपिंप्रीला बुरशी लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने यासाठी अनुदान देण्याची व पीक विमा योजनेत या पिकाचा समावेश करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पान पिंपरी वेलवर्गीय वनस्पती
पानपिंपरी ही बहुवर्षीय वेल प्रकारात मोडते. या वनस्पतीच्या मुळांचा वापर औषध निर्मिती करता केला जातो. अलीकडच्या काळात पान पिंपरी लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. पान पिंपरीच्या वाढीसाठी संशयतोष्ण ते उष्णकटिबंधीय हवामान पोषक ठरते. उबदार दमट काही प्रमाणात सावली असे हवामान या पिकास अनुकूल आहे. पान पिंपरीची लागवड जानेवारी ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करतात. लागवड केल्यानंतर एक ते सहा महिन्यांनी फळे येण्यास सुरुवात होते. काही दिवसांपूर्वी चारशे रुपये किलो दराने विक्री सुरु होती. मात्र सद्यस्थितीत हे दर निम्म्यावर आले आहेत.