नंदुरबार जिल्ह्यातकेळीचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. गेल्या दोन वर्षापासून केळीला दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने यंदाही तीच परिस्थिती राहील, अशी अपेक्षा असताना यंदा ऐन महाशिवरात्री व रमजान महिन्याच्या काळातच केळीचे भाव घसरले आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सध्या केळीला जिल्ह्यात ८०० ते १२०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात फळ पिकाचे क्षेत्र वाढत आहे. एकूण फळ पिकांच्या क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र हे केळी व पपईचे आहे. त्यातही केळी सर्वाधिक आहे. नंदुरबार, शहादा व तळोदा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील केळी यापूर्वी विदेशात देखील निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे केळीचा हब म्हणून शहादा तालुका ओळखला जाऊ लागला आहे. पपई प्रमाणेच आता केळीच्या भावासाठीही शेतकरी हवालदिल होऊ लागला आहे. यंदा किमान १८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित असताना निम्मे भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत.
रमजान महिन्यात मोठी मागणी
दोन वर्षांपासून केळी फायदेशीर मागच्या दोन वर्षांपासून केळीला दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. महाशिवरात्री आणि रमजान महिन्याच्या काळात केळीला अधिक मागणी राहत असल्याने या काळात सर्वाधिक भाव मिळत होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. जास्त खर्च आला तरी चांगल्या क्वालिटीची केळी लागवड करीत शेतकऱ्यांनी चांगल्या भावाची अपेक्षा केली होती, परंतु ती अपेक्षा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.
चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत
शिवरात्री आणि रमजानच्या काळात ज्यावेळी केळीला अतिउच्च भावाची अपेक्षा असते. तेव्हा केळीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. उत्पादन खर्च काढणेही जिकिरीचे सध्या मिळत असलेला भाव हा उत्पादन खर्च निघणेही मुश्कील ठरेल असा आहे. केळी उत्पादक पट्टा असलेल्या मध्यप्रदेशातील ब-हाणपूर, रावेर, चोपडा येथील बाजारातील बोर्डाचा भाव १,९५० ते २,१०० रुपये प्रतिक्विंटल असताना नंदुरबार तालुक्यात विशेषतः शहादा, ब्राह्मणपुरी भागात खूपच कमी भाव मिळत असतो. शिवाय चोपड़ा, शिरपूर आणि भरूच (गुजरातला) प्रत्यक्षात खूपच फरकाने भाव मिळत असतो; मात्र परिसरातील व्यापारी युनियन करून शेतकऱ्यांना जास्तीचा भाव नाकारतात असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
शेतकरी काय म्हणाले....
शेतकरी डॉ. अजित पाटील म्हणतात की, जळगाव, रावेर येथे केळीचे बोर्ड भाव जास्त असून आपल्याकडे कमी भावात व्यापारी केळी खरेदी करीत आहे. आपण विचारणा केली तर केळीला मागणी कमी असल्याचे सांगून कमी भावात खरेदी करीत आहे. तरी आता केळी मोठ्या प्रमाणात निघायला सुरुवात झाली असून मात्र कमी भावात खरेदी होत असल्याने नाराजी आहे. तर शेतकरी साहेबराव कापडे म्हणाले की, तोडणी ला नुकतेच सुरुवात झाली आहे. सुरवातीलाच भाव कमी असल्याने शेतकऱ्यांसमोर एक नवे संकट उभे राहणार असल्याचे चित्र असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तर येथील ब्राह्मणपुरी व्यापारी दिगंबर पाटील म्हणाले की, सध्या केळी तोडणीची सुरूवात आहे. त्यामुळे भाव अपेक्षित नाहीत. येत्या काळात ज्या प्रमाणे मागणी वाढेल, त्या प्रमाणात भाव वाढतील. सध्या प्रचलीत दरानेच भाव दिला जात असल्याचे ते म्हणाले.
आजचे केळीचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
11/03/2024 | ||||||
नाशिक | भुसावळी | क्विंटल | 540 | 1200 | 1700 | 1500 |
नागपूर | भुसावळी | क्विंटल | 67 | 450 | 550 | 525 |
पुणे | लोकल | क्विंटल | 12 | 800 | 1400 | 1100 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 68 | 1500 | 5000 | 3250 |
यावल | नं. १ | क्विंटल | 2950 | 1700 | 1900 | 1800 |