चंद्रपूर : खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली. गतवर्षी मिरची पिकाला चांगला भाव मिळाला होता. पण सध्या मिरचीचे भाव पाच हजारांवर येऊन ठेपले असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लागवड खर्चही निघेनासा झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये नगदी पीक म्हणून मिरची पिकाची लागवड केली. वार्षिक आर्थिक बजेट डोळ्यासमोर ठेवून मिरची पिकावर अमाप असा खर्च केला. मिरची पिकातून भरपूर उत्पादने घेण्यासाठी त्याला वेळोवेळी खते, औषधे यांची मात्रा न चुकता शेतकरी देऊ लागले. सुरुवातीला चुरडा मुरड्या रोगाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यावर उपाययोजना करून औषध फवारणी करून मिरचीचे पीक उभे केले. मागील वर्षी ३५ हजारांपर्यंत गेलेला मिरचीचा भाव यंदाही किमान वीस-पंचवीस हजारांपर्यंत मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण यावर्षीचे चित्र आता पंधरा दिवसांतील काळात काही वेगळेच बघायला मिळाले आहेत.
केलेला खर्चही निघेना !
खतांचा, औषधांचा, बी-बियाण्यांचा, निंदन, फवारणी, तोडणी खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. पाच हजार रुपये मिरचीला भाव मिळत असल्याने पुढील हंगामात आता कोणते पीक घ्यायचे, हा देखील प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लाल मिरची नागपूर मार्केटला नेली असता, त्या मिरचीला पाच ते सहा हजारांपर्यंत भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
आजचे लाल मिरचीचे बाजारभाव
पुणेबाजार समितीत हिरव्या मिरचीची 393 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 3000 रुपये तर सरासरी 4500 रुपये दर मिळाला. रत्नागिरी बाजार समितीत कमीत कमी 4000 रुपये तर सरासरी 5000 रुपये दर मिळाला. अकलुज बाजार समितीत कमीत कमी 4000 रुपये तर सरासरी 6000 रुपये दर मिळाला. इस्लामपूर बाजार समितीत सरासरी 5250 रुपये दर मिळाला. राहता बाजार समितीत सरासरी 3000 रुपये बाजारभाव मिळाला.