- सुनील चरपेनागपूर : यावर्षी साेयाबीनचे (Soyabean Production) प्रतिएकर उत्पादन तीन ते चार क्विंटल आणि खर्च प्रतिक्विंटल ४,१०० ते ५,४७० रुपये आहे. राज्य सरकारने केंद्राच्या सीएसीपीला ६,०३९ रुपये प्रतिक्विंटल उत्पादन खर्च सादर केला असून, ६,९४५ रुपये एमएसपी शिफारस केली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेतला तर किमान १,३०० रुपये, सरकारने काढलेला खर्चानुसार २,१३९ रुपये व शिफारस केलेल्या एमएसपीनुसार ३,०४५ रुपये प्रतिक्विंटल नुकसान (Soyabean farmer) सहन करावे लागत आहे.
वाढलेले कृषी निविष्ठा व मजुरीचे दर, राेग व किडींचे व्यवस्थापन, सततचा पाऊस व प्रतिकूल हवामान यामुळे साेयाबीनचा उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादन घटले आहे. सरकारने एमएसपी दराने खरेदी सुरू न केल्याने शेतकऱ्यांना सरासरी ३,९०० रुपये दराने साेयाबीन विकावे लागत आहे. एमएसपी दराने साेयाबीन विकण्यासाठी आधी नाफेड व एनसीसीएफकडे ऑनलाइन नाेंदणी करणे अनिवार्य आहे.
या संस्थांचे अधिकारी व कर्मचारी साेयाबीन खरेदीच्यावेळी शेतकऱ्यांना त्रास देतात व चुकारे देण्यास बराच विलंब करतात. कांदा खरेदी प्रकरणात नाफेड व एनसीसीएफ या दाेन्ही संस्थांचा भ्रष्ट कारभार उघड झाला आहे. नाफेडचे चेअरमन जेठाभाई अहीर यांनी कांदा खरेदीतील नाफेड व एनसीसीएफचा भ्रष्टाचार उघडपणे मान्य केला आहे. या संस्थांकडून ६० दिवसांत १३ लाख टन साेयाबीन खरेदी शक्यता मावळली आहे.
उत्पादन खर्च व एमएसपीतील घाेळमहाराष्ट्रातील साेयाबीनचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ६,०३९ रुपये म्हणजेच २४,१५६ रुपये प्रतिएकर असल्याचे राज्य सरकारने केंद्र सरकारला कळविले हाेते. त्याअनुषंगाने राज्याने केंद्राकडे ६,९४५ रुपये एमएसपीची शिफारस केली हाेती. केंद्र सरकारने साेयाबीनचा उत्पादन खर्च ३,२६१ रुपये असल्याचे सांगत ४,८२१ रुपये एमएसपी जाहीर केली.
साेयाबीनचे अर्थशास्त्रएक क्विंटल साेयाबीनपासून १२ ते १३ किलाे तेल व ८५ ते ८७ किलाे ढेप मिळते. त्यामुळे साेयाबीनचे दर तेलाऐवजी ढेपेच्या दरावर ठरतात. जगात नाॅन जीएम साेयाबीनचे उत्पादन भारताव्यतिरिक्त कुठेही घेतले जात नाही. जीएम साेयाबीनचे उत्पादन प्रति हेक्टर किमान ३२ ते ३५ क्विंटल असल्याने जागतिक बाजारात साेया ढेपेचे दर भारतापेक्षा कमी आहेत. त्यामुळे भारतीय साेया ढेपेची निर्यात थांबली असून, साेयाबीनचे दर दबावात आहेत.
जीएम साेया ढेपवर आयात शुल्क लावाकेंद्र सरकारने जीएम पिकांच्या उत्पादनावर बंदी घातली असली तरी जीएम साेया तेल व ढेपेच्या आयातीला अधिकृत परवानगी दिली आहे. साेया तेलाच्या आयातीवर शुल्क लावला असला तरी ढेप मात्र शुल्क मुक्त आयात केली जाते. केंद्र सरकारने जीएम साेया ढेपेच्या आयातीवर किमान ७० टक्के आयात शुल्क लावल्यास तसेच नाॅन जीएम साेया ढेपेच्या निर्यातीला सबसिडी दिल्यास साेयाबीनला सहा हजार रुपये दर मिळू शकताे. उत्पादन वाढविण्यासाठी जीएम पिकांना परवानगी देणे आवश्यक आहे.