नंदुरबार : यंदाच्या मोसमातील लाल मिरचीचा (Chilly Market ) हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी येथील बाजारात ४०० क्विंटल मिरचीची आवक झाली. आवक झालेल्या लाल मिरचीला मिळणारे दर कमी आहेत; परंतु वातावरणात झालेल्या बदलामुळे मिरची लाल होण्यास वेगात प्रारंभ झाल्याने आवक वाढल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिरची आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar Mirchi Market) मोठ्या संख्येने शेतकरी मिरची उत्पादन घेतात. यातून नंदुरबार बाजार समितीत दरवर्षी सप्टेंबर ते मार्च या कालावधीत ३ लाख क्विंटल मिरचीची सरासरी आवक होते. जिल्ह्यात यंदा मिरची लागवडीनंतर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. काही ठिकाणी मिरची रोपे पाण्याखाली गेल्याने नुकसानही झाले होते.
तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक काळ ढगाळ वातावरण असल्याने मिरची हंगाम धोक्यात येण्याची शक्यता होती. ऊन नसल्याने मिरची लाल होण्याची प्रक्रिया थांबली होती; परंतु गेल्या १० दिवसात उन पडू लागल्याने लाल मिरचीची आवक सरू झाली आहे. मिरचीचे दर स्थिर राहिल्यास दिवाळीपर्यंत हिरवी मिरची बाजारात वाढीव आवकने येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम लाल मिरचीच्या हंगामावर होऊन आवक घसरण्याची अधिक शक्यता आहे.
बाजारात लाल आणि हिरवी अशा दोन्ही मिरचीची आवक आहे. लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. वातावरणात झालेला बदल लाल मिरचीसाठी पोषक ठरत आहे. यामुळे येत्या काळात आवक वाढणार आहे. - योगेश अमृतकर, सचिव, कृउबा, नंदुरबार
गौरीला सर्वाधिक पसंती यंदा नंदुरबार तालुका व परिसरात ३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात मिरची लागवड करण्यात आली आहे. यात ७० टक्के शेतकऱ्यांनी गौरी या मिरची वाणाला सर्वाधिक पसंती दिली आहे. आकाराने लांब व बारीक असलेली ही मिरची सध्या झाडांवर लगडली आहे. या वाणाला बाजारात प्रतिक्विंटल २ हजार ते ४ हजार ८०० रुपये दरात व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत. एकीकडे लाल मिरची बाजारात आली असताना, हिरवी मिरचीला बाजारात प्रतिकिलो ३० ते ५० रुपये दर मिळत आहे.
आजचे ताजे बाजारभाव
जिल्हा | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
23/09/2024 | ||||||
मंबई | लोकल | क्विंटल | 100 | 18000 | 40000 | 29000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 181 | 12000 | 14000 | 13500 |
नंदुरबार | हायब्रीड | क्विंटल | 3 | 8225 | 8225 | 8225 |
नंदुरबार | ओली | क्विंटल | 317 | 2000 | 4800 | 3400 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 11 | 5000 | 14600 | 8500 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 612 |