Join us

शेतकऱ्यांनो! धान विक्रीसाठी आधी नोंदणी करा, 'ही' आहेत धान खरेदी केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 17:08 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या रबी हंगामात धान व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे.

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात धान व मक्याची खरेदी करण्यात येणार आहे. धान खरेदीसाठी ९३ तर मका खरेदीसाठी तीन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप व रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये धान / भरडधान्य आदिवासी विकास महामंडळास विक्रीकरिता नोंदणीस सुरुवात करण्यात आली आहे. गडचिरोली व अहेरी प्रादेशक कायार्लयांतर्गत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी ३० एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.

आदिवासी विकास महामंडळातील गडचिरोली प्रादेशिक कार्यक्षेत्रांतर्गत ५४, तर अहेरी कार्यक्षेत्रांतर्गत ३९ असे एकूण ९३ धान खरेदी केंद्रास मंजुरी प्रदान करण्यात आली असून, १५ ते ३० एप्रिलपर्यंत धान विक्री नोंदणी करता येणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान नोंदणी व विक्रीकरिता ई-पीक पेरा नोंदणी, ई-केव्हायसी प्रमाणपत्र, चालू हंगामाचा सातबारा ३० एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करावी. तसेच मका खरेदीसाठी कुरखेडा, धानोरा व मार्कंडा ता. चामोर्शी हे तीन खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी संबंधित खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे यांनी केले आहे.

गतवर्षी २८ हजार क्विंटल मका खरेदी

गतवर्षी २०२२-२३ च्या रबी हंगामात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आधारभूत केंद्रांवरून मक्याची खरेदी करण्यात आली. गतवर्षीच्या रबी हंगामात एकूण २८ हजार २८३ क्चिटल इतका मका खरेदी करण्यात आला. गेल्या पाच- सहा वर्षांपासून कुरखेडा, धानोरा, चामोर्शी तालुक्यात मका पिकाची लागवड वाढली आहे. यावर्षीच्या रबी हंगामात मका खरेदीसाठी कुरखेडा, धानोरा, मार्कडा कं. असे तीन केंद्र आहेत.

गतवर्षी पावणे दोन लाख क्विंटल धान खरेदी

गतवर्षी २०२२-२३ या रबी हंगामात महामंडळाच्या वतीने आधारभूत किमतीनुसार धानाची खरेदी करण्यात आली. गतवर्षी रबी हंगामात १ लाख ८१ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यावर्षीसुद्धा आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, देसाईगंज या चार तालुक्यासह अहेरी उपविभागातही उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी चांगले उत्पादन होणार असल्याने धान खरेदीचा आकडा वाढणार आहे.

टॅग्स :शेतीगडचिरोलीभातशेती क्षेत्र