Join us

Rice Export : 'या' जिल्ह्यातील तांदळाची परदेशात निर्यात, दोन लाख शेतकऱ्यांकडून उत्पादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 7:30 PM

Rice Export : या जिल्ह्यातून आफ्रिका, सिंगापूर, दुबईसह इतर देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जाते.

गोंदिया  : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड (Rice Cultivation) केली जाते. येथे उत्पादित होणाऱ्या धानाचा दर्जा उत्तम असल्याने त्यापासून तयार होणाऱ्या तांदळाला देश आणि विदेशात भरपूर मागणी आहे. जिल्ह्यातून आफ्रिका, सिंगापूर, दुबईसह इतर देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात (rice Export) केली जाते. त्यामुळे यावर आधारित राईस मिल उद्योगाला बळ मिळाले आहे. त्यामुळे धानाला सुद्धा चांगला दर मिळण्यास मदत होती. 

गोंदिया जिल्ह्यात सरासरी १२४५ मिमी पाऊस पडतो. एवढ़ा पाऊस धानाच्या लागवडीसाठी पुरेसा आहे. तर सिंचनाच्या सोयी देखील पुरेशा प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. यातून जवळपास ४० ते ५० लाख क्विंटल धानाचे उत्पादन होते. त्यामुळे त्यावर आधारीत राईस मिल उद्योग येथे आहे. जवळपास ३०० राईस मिल असून त्यात चांगल्या दर्जाच्या धानाची भरडाई करून त्यापासून तांदूळ तयार करून देश -विदेशात निर्यात केली जाते. जिल्ह्यातून दरवर्षी लाखो टन तांदळाची निर्यात होते. त्यामुळे याची शेतकरी व व्यापाऱ्यांना मदत होते.

चांगल्या प्रतीच्या धानाचे उत्पादन गोंदिया जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. दोन लाखावर शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. चांगल्या प्रतीच्या धानाचे उत्पादन होत असून बासमतीसह, जय श्रीराम, चिन्नोर व ठोकळ तांदळाची देश-विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजित आडसुळे यांनी सांगितले.

धानाच्या शेतीच्या लागवड खर्च वाढत आहे. पण त्या तुलनेत धानाला मिळणारा दर कमी आहे. शासनाने धानाला प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव दिल्यास शेतकयांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. - निहारीलाल दमाहे, शेतकरी

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीगोंदिया