Join us

Rice Market Update : निर्यात बंदी हटवली, देशांतर्गत बाजारपेठांमध्ये तांदळाला काय बाजारभाव मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 9:26 PM

Rice Market Update : जागतिक बाजारात तांदळाच्या किमती घसरल्या आहेत, तर महाराष्ट्रातील समाधानकारक दर मिळू लागले आहेत.

Rice Market Update :  केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळावरील (Rice Market) निर्यात बंदी हटवली. तर किमान निर्यात मूल्य ४९० डॉलर प्रति टन या दराने निर्यात करता येणार आहे. या निर्णयानंतर जागतिक बाजारात तांदळाच्या किमती घसरल्या आहेत, तर महाराष्ट्रातील तांदळाच्या मार्केटमध्ये समाधानकारक दर मिळू लागले आहेत. याबाबतचे खात्रीलायक वृत्त राऊटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. 

भारत हा जगातील नंबर एकचा तांदूळ (Rice Export) निर्यातदार समजला जातो. मात्र मागील वर्षी जुलै मध्ये निर्यात बंदी करण्यात आली होती. यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये बाजारभावांवर परिणाम झाला होता. शिवाय देशातील गोदामांमध्ये तांदळाचा साठा वाढला होता. अशा स्थितीत केंद्र सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलत निर्यात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये तांदळाला चांगला दर मिळू लागला आहे. मात्र जागतिक बाजारपेठांमध्ये किंमती घसरल्याचे राऊटर्स या वृत्तसंस्थेने नमूद केले आहे. 

दरम्यान देशांतर्गत बाजारपेठांमध्ये तांदळाचा बाजारभाव (Paddy Market Price) पाहिला असता पंजाबच्या अमृतसर मार्केटमध्ये बासमती तांदळाला कमीत कमी 2200 रुपये आणि सरासरी 2300 रुपये दर मिळाला. तर उत्तर प्रदेशातील अलिगढ बाजार समितीमध्ये कमीत कमी 2650 रुपये, तर सरासरी 2850 दर मिळाला. तर महाराष्ट्रातील काही निवडक बाजार समित्यांचा विचार केला तर आज पुणे बाजारात कमीत कमी 7000 रुपये तर सरासरी 9750 रुपये दर मिळाला. मुंबई बाजारात कमीत कमी 5800 तर सरासरी 8550 रुपये दर मिळाला. 

यंदा तांदळाच्या उत्पादनात वाढ? 

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक आणि जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. आता महाराष्ट्रात दिवाळींनंतर भात कापणीला सुरवात होण्याची शक्यता आहे. यंदा तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यत भात पिकाला पोषक वातावरण मिळाले असल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येण्याची आशा आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने निर्यात खुली केल्याने बाजारभावही चांगला मिळण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीमहाराष्ट्र