नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग चाैथ्या वर्षी कापसाच्या बीजी-२ बियाण्यांच्या दरात प्रतिपाकीट (प्रत्येकी ४५० ग्रॅम) ११ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे कपाशीच्या साध्या लागवडीसाठी हेक्टरी ५५ रुपये तर सघन लागवडीसाठी १६५ रुपयांचा केवळ बियाण्यांचा खर्च वाढणार आहे.
देशात दरवर्षी सरासरी १३० लाख हेक्टर तर महाराष्ट्रात सरासरी ४२ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. देशात जवळपास २५ हजार तर महाराष्ट्रात १० हजार हेक्टरमध्ये अतिघन पद्धतीने कपाशीची लागवड केली जाते. कपाशीची साध्या पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास हेक्टरी पाच पाकिटे (प्रत्येकी ४५० ग्रॅम) तर अतिघन लागवड करावयाची झाल्यास हेक्टरी १५ पाकिटे लागतात. बियाण्याचे दर प्रतिपाकीट ११ रुपयांनी वाढल्याने बियाण्याचा खर्च प्रतिहेक्टर ५५ ते १६५ रुपयांनी वाढणार आहे.
सध्या देशभरात वापरल्या जाणाऱ्या कापसाच्या बीजी-२ बियाण्यांमधील जनुकांसाठी बियाणे उत्पादक कंपन्या अथवा केंद्र सरकार कुणालाही राॅयल्टी देत नाही. शिवाय, बीजी-२ बियाणे गुलाबी बाेंडअळीला प्रतिबंधक राहिले नाही. त्यामुळे ते ‘आउटडेटेड’ झाले. या बियाण्यांची सरकारने दरवाढ करायला नकाे हाेती. उलट, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित तण, गुलाबी बाेंडअळी व रस शाेषण करणाऱ्या किडींना प्रतिबंधक बियाणे उपलब्ध करून दिल्यास आपण वाढीव दराने खरेदी करायला तयार आहाेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
जनुके निष्प्रभ असलेले बियाणेदेशात सन २००३ पासून कापसाच्या बीटी अर्थात बीजी-२ बियाण्यांचा वापर सुरू झाला. त्या बियाण्यांमध्ये ‘बॅसिलस थुरिंगिएन्सिस’ जनुके असायचे. या जनुकांसाठी कंपनीला राॅयल्टी दिली जायची. केंद्र सरकारने सन २०१० मध्ये बीजी बियाण्यांच्या चाचण्या व वापरावर बंदी घातली. या बियाण्यांमध्ये बीटीचे जनुके नसल्याने ते गुलाबी बाेंडअळीला प्रतिबंधक बियाणे राहिले नाही. बीजी-२ बियाण्यांच्या ट्रायल्स घ्याव्या लागत नाहीत. एकदा तयार केलेले बियाणे ३ ते ४ वर्षे चालते. कंपनीला केवळ साठवणूक व वाहतुकीवर खर्च करावा लागताे.
बियाणे उत्पादक कंपन्यांचा दबावकृषी निविष्ठांसह मजुरीचे वाढलेले दर, इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, सीड प्लाॅटसह वाढलेला इतर खर्च विचारात घेता देशातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी प्रतिपाकीट १०० रुपयांची दरवाढ करावी, यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला हाेता. परंतु, निवडणुका विचारात घेता केंद्र सरकारने ११ रुपयांची वाढ केली.
बीजी-२ बियाण्यांची दरवाढ(प्रतिपाकीट-रुपयांत)वर्ष - दर - वाढ/कमी१) २०२०-२१ - ७३० - स्थिर२) २०२१-२२ - ७६७ - ३७ रु. वाढ३) २०२२-२३ - ८१० - ४३ रु. वाढ४) २०२३-२४ - ८५३ - ४३ रु. वाढ५) २०२४-२५ - ८६४ - ११ रु. वाढ...केंद्र सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक बियाणे उपलब्ध करून दिल्यास शेतकरी ते वाढीव दराने आनंदात खरेदी करतील. परंतु, सध्याच्या बियाण्याची दरवाढ नाराजी निर्माण करणारी आहे.- दिलीप ठाकरे, सदस्य, एमसीएक्स काॅटन (पीएसी).