नाशिक : स्थानिक प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणून ओळख असलेल्या 'क्रोटन गिब्सोनियानस' (Croton gibsonianus) अर्थात 'सह्याद्री क्रोटन' ही लहान वाढणारी स्थानिक प्रदेशनिष्ठ वृक्ष प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वृक्ष प्रजातीची शंभर ते दीडशे झाडे शिल्लक राहिली आहेत. ही वृक्ष प्रजाती जगात केवळ कळसूबाई- हरिश्चंद्रगड (Kalsubai) अभयारण्यात आढळते. या दुर्मिळ वृक्ष प्रजातीच्या संवर्धनासाठी आता नाशिक वन्यजीव विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सह्याद्रीच्या पश्चिम घाटात (Sahyadri) अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पती आढळतात. जैवविविधतेने समृद्ध असलेला हा भाग राज्याचे निसर्गवैभव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड व कळसूबाई पर्वताच्या पायथ्याशी विस्तारलेल्या अभयारण्यामध्ये ही वनसंपदा व वन्यजीवसंपदा आढळते. जगात केवळ याच अभयारण्यात हरिश्चंद्रगडाच्या परिसरात 'सह्याद्री क्रोटन' ही वृक्ष प्रजाती आढळते.
इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरच्या 'वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट' चमूने या वृक्ष प्रजातीला नष्टप्राय श्रेणीत स्थान दिले आहे. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत वृक्ष अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. ही वृक्ष प्रजाती प्रदेशनिष्ठ असली, तरीदेखील तिची संख्या मात्र अत्यल्प राहिली आहे. यामुळे या वनस्पतीचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट चमूचे सदस्य असलेले मयूर नंदीकर 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.
...अशी आहे वनस्पती
हरिश्चंद्रगडाच्या परिसरात निम- सदाहरित जंगल वृक्ष प्रजातीचा अधिवास. येथील ओढे, नाल्यांमध्ये लहान झाडे दिसून येतात. या झाडांची वाढ साधारणतः २ ते ३ मीटर इतकी होते. हिवाळ्यात पानगळ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागताच या वृक्षाला फुलोरा येण्यास सुरुवात होते. पावसाळ्यात फळधारणा होते. नदी-नाले, ओढ्यांसारख्या पाणथळ जागेत जैवविविधता टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
२०२१ साली लागला पुनर्शोध !
वनस्पती अभ्यासक मयूर नंदीकर यांनी २०२१ साली या वनस्पतीचा पुनर्योध लावला. हरिश्चंद्रगडाच्या परिसरातील जंगलात फिरून याबाबत सखोल अभ्यास केला. त्यांच्यासोबत मनिरुद्दीन धाबक, ऋषभ चौधरी, स्नेहा ब्रह्मदंडे यांनीही परिश्रम घेत रिसर्च पेपर प्रसिद्ध केले होते. कर्नाटकात आढळणारी वृक्ष प्रजाती ही पूर्णपणे वेगळी असून, मूळ 'सह्याद्री क्रोटन ही प्रजाती हरिश्चंद्रगडावर आढळते, असे या अभ्यासातून लक्षात आल्याचे मयूर नंदीकर म्हणाले.
...असे झाले नामकरण
बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले वनसंरक्षक अलेक्झांडर गिब्सन यांनी १८३९ साली या वृक्ष प्रजातीच्या पानाफुलांचे नमुने गोळा केले. इंग्रज वनस्पतीशास्त्रज्ञ जोसेफ निम्मो यांनी या नमुन्यांचा अभ्यास करून त्याचे नामकरण गिब्सन यांच्या नावावरून 'क्रोटन गिब्सोनियानस' असे केले.
'सह्याद्री क्रोटन' या दुर्मिळ वृक्ष प्रजातीचे अभयारण्यात आढळस्थान शोधून त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना भंडारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नाशिक वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा प्रस्ताव नागपूर प्रधान कार्यालयाला पाठविला आहे. अभ्यासकांनीसुद्धा यासाठी योगदान द्यावे.
- अनिल पवार, सहायक वनसंरक्षक, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य