Join us

लाखोंचा खर्च, प्रचंड मेहनत, पण भावच नाही, सांगा कसं जगायचं, द्राक्ष उत्पादकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 9:01 AM

देशांतर्गत बाजारपेठांत कवडीमोल दरात द्राक्षविक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

नाशिक : जानेवारी महिना सुरू झाला की द्राक्षाचा खरा हंगाम सुरू होतो. यूरोपीयन देश, रशियासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळमध्ये जिल्ह्यातून द्राक्षे मोठ्या प्रमाणात निर्यात होतात, यंदा हंगामाच्या सुरुवातीला देशांतर्गत बाजारपेठांत कवडीमोल दरात द्राक्षविक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. निर्यातक्षम द्राक्ष चांगल्या भावात विक्री होत असली तरी स्थानिक बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून मागणी नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

यंदा पाऊस कमी पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची लवकर छाटणी केली. फेब्रुवारी महिन्यात पाण्याचा तुटवडा जाणवेल म्हणून अनेकांनी जानेवारी महिन्यात प्लॉट खाली होईल, अशा पद्धतीने छाटणीचे नियोजन केले. दोन वर्षापासून हंगामाच्या सुरुवातीलाच विक्री होणारे द्राक्ष चांगल्या भावात विकली जात, त्यामुळे यंदाही चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, द्राक्षांचा हंगाम सुरू झाला आणि कवडीमोल भावांत द्राक्षे विकावी लागत आहेत. मुळात अनेक द्राक्षवागा देण्यासाठी योग्य असून, व्यापारी येत नसल्याने शेतकऱ्यांना आता उभ्या पिकाचे करायचे काय, असा प्रश्न भेडसावत आहे.

द्राक्षांवर आधारित अनेक उद्योजक, व्यावसायिक मोठे झाले. द्राक्षपिकासाठी लागणारा कोणताही खर्च करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे औषध दुकानदार, रासायनिक खते विक्रेते आणि शेतमजुरांना चांगले पैसे मिळतात; पण, त्यातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा नफा शिल्लक राहत नाही. द्राक्ष शेती नको, असा विचार मनात येत आहे. -सुरेश कमानकर, शेतकरी

कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटांचा सामना करून पिकवलेली द्राक्ष अगदी कवडीमोल भावात विकावी लागत असल्यामुळे द्राक्षपीक शेतकऱ्यांना अधोगतीकडे घेऊन जात आहे. कर्ज काढून पिकवलेल्या द्राक्षबागांवर झालेला खर्चही वसूल होत नाही. सरकारची अनेक ध्येयधोरणे यासाठी कारणीभूत आहेत.

- संपत शिंदे, द्राक्ष उत्पादक, सायखेडा

खर्च कसा फेडायचा?

लाखो रुपये खर्चुन पिकवलेली दाचे कवडीमोल दरात विकण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षे पंधरा ते वीस रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत आहेत. बाजारभाव पडण्याचे कोणतेही कारण व्यापाऱ्यांना सांगता येत नाही. त्यामुळे द्राक्षबागावर केलेला लाखोचा खर्च कसा फेडायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकद्राक्षेमार्केट यार्डकांदा