राहुरी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत - ७८० या वाणांच्या २१ मे २०२४ पासून विक्रीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कांदा बियाणांची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली आहे.
विद्यापीठाने विकसित केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ व फुले बसवंत - ७८० या वाणांना शेतकऱ्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, निफाड, कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषी संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर, कृषी संशोधन केंद्र, बोरगाव, जि. सातारा, कृषी महाविद्यालय, मालेगाव जि. नाशिक, कृषी संशोधन केंद्र लखमापूर, कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषी महाविद्यालय पुणे व कृषी महाविद्यालय हाळगाव, ता. जामखेड या ठिकाणी या वाणांची विक्री सुरु करण्यात येणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यातच प्रति किलो प्रमाणे उपलब्ध होणार आहे. फुले समर्थ बसवंत 780 या दोन्ही कांद्याचे बियाणे कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे 21 मे पासून विक्री उपलब्ध होतील तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, अशी माहिती धुळे कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक डॉक्टर दिनेश नांद्रे यांनी दिली आहे.
फुले समर्थ वाणाची वैशिष्ट्ये :
कांदा बसवंत - ७८०
फुले समर्थ हा वाण स्थानिक वाणातून विकसित केला आहे. हा वाण खरीप व रांगडा हंगामासाठी योग्य असून, कांदे चकचकीत गर्द लाल रंगाचे व उबट गोल असतात. कांद्याची नैसर्गिकपणे पात पडते. कांदा ८६ ते ९० दिवसांत काढणीस तयार होतो, त्यामुळे दोन ते तीन पाणी पाळ्यांची बचत होते. खरीप हंगामात या वाणापासून २८० क्विंटल प्रति हेक्टर तर रांगड्या हंगामात ४०० क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळते.
फुले बसवंत वाणाची वैशिष्ट्ये :
हा वाण पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने स्थानिक वाणातून विकसित केला आहे. हा वाण खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे. कांदे आकाराने मध्यम ते मोठे व शेंड्याकडे थोडे निमुळते असतात. रंग गडद लाल असून हा वाण काढणीनंतर तीन ते चार महिने साठवणुकीत टिकून राहतो. हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटलपर्यंत मिळते.