Rice Market : धान्याचा तुटवडा असलेली राज्ये 1 ऑगस्ट 2024 पासून खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) ई लिलावात सहभागी न होता भारतीय अन्न महामंडळाकडून 2,800 रुपये प्रति क्विंटल दराने तांदूळ खरेदी (Rice Market) करू शकतात असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. नवीन खरेदीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात असलेला अतिरिक्त साठा कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत भारत सरकारचा अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, 2,800 रुपये प्रति क्विंटल दराने राज्य सरकारांना धान्य थेट विक्री करू शकतो. जर राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना निर्धारित केलेल्या प्रतिव्यक्ती 5 किलोग्रॅम मोफत धान्यापेक्षा अधिक धान्य खरेदी करायचे असेल तर ते आधीच्या 2,900 रुपये प्रति क्विंटल दराऐवजी 2,800 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करू शकतात असे जोशी यांनी सांगितले. ‘भारत’ ब्रँड अंतर्गत 30 जून 2024 पर्यंत सुरु असलेली गव्हाचे पीठ आणि तांदळाची विक्री यापुढेही सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
देशातील ऍनिमिया आणि पोषण कमतरता या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सर्व तीन टप्पे पूर्ण केले असून शासनाच्या प्रत्येक योजनेत पारंपरिक पद्धतीने तयार तांदळाची जागा पोषणमूल्य असलेल्या फोर्टिफाइड तांदूळाने घेतली आहे आणि मार्च, 2024 पर्यंत फोर्टिफाइड तांदळाचे 100% वितरण करण्यात आले आहे. "दर्जेदार आणि पौष्टिक अन्न हे पंतप्रधान मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे”, असे ते म्हणाले.
सध्या तांदळाला बाजारभाव काय?
आज राज्यातील बाजार समितीमध्ये तांदळाला क्विंटलमागे पालघर बेवुर बाजारात 3810 रुपये, पुणे बाजारात बासमती तांदळाला 9500 रुपये, मुंबई बाजारात 10 हजार रुपये, कल्याण बाजारात 7 हजार 700 रुपये, तर पुणे बाजारात कोलम तांदळाला 06 हजार रुपये, अलिबाग बाजारात 1200 रुपये, मुंबई बाजारात लोकल तांदळाला 5000 रुपये तर पुणे बाजारात मसुरा तांदळाला 3350 रुपये, तर कल्याण बाजारात 2800 रुपये दर मिळाला.