सर्वसामान्य ग्राहकाना स्वस्त दरात गहू आणि तांदूळ यासाठी भारत ब्रँडच्या माध्यमातून विक्री केला जात आहे. या योजेनची मुदत 31 मार्चपर्यंत होती, मात्र या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे भारत ब्रॅण्डच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना गहू तांदूळ मिळू शकणार आहे. म्हणूनच या दोन्हीच्या अतिरिक्त साठ्याचे वितरण करण्यात येणार आहे.
गहू / पीठाच्या वाढत्या किमती कमी करता याव्यात या उद्देशाने ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने केंद्रीय भांडार / राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ ) / नाफेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महामंडळ इंडिया लिमिटेड/ महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (एमएससीएमएफएल) अशा निमशासकीय आणि सहकारी संस्थांना खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत (प्रादेशिक) गव्हाच्या अतिरिक्त साठ्याची तरतूद केली होती. यानुसार गव्हाचे पीठ तयार करून त्याची 'भारत आटा' या ब्रँडअंतर्गत सर्वसामान्य ग्राहकांना विक्री करावी असे निर्देश दिले गेले होते.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिनांक 18. 01. 2024 रोजी देखील एक पत्र पाठवले होते. या पत्राद्वारे विभागाने केंद्रीय भांडार / एनसीसीएफ / नाफेड / महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड अशा निमशासकीय आणि सहकारी संस्थांना खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत (प्रादेशिक) "भारत राईस /भारत चावल" ब्रँडअंतर्गत सामान्य ग्राहकांना विकण्यासाठी बिगर - फोर्टिफाइड तांदळाचे अतिरिक्त तरतूद केली होती. या अनुषंगाने भारतीय अन्न महामंडळही धान्यसाठा उपलब्ध राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी दळणवळणाची सुनियोजित व्यवस्थाही राखत आहे. त्यानंतर हा साठा या वर नमूद यंत्रणांना दिलेल्या सूचनांनुसार,'भारत' या ब्रँडअंतर्गत वितरणासाठी पुरवला जात आहे.
असे आहेत दर
दरम्यान सुरुवातीला या योजना 31 मार्चपर्यंत लागू होत्या, मात्र त्यानंतर या योजनांना 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळद्वारे या संबंधित संस्थांना गहू 17.15 रुपये किलो दराने आणि तांदूळ 18.59 रुपये किलो दराने उपलब्ध करून दिला जात आहे. त्यानंतर या संस्थांद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना 5 किलो / 10 किलोच्या पाकिटांमध्ये पीठ 27.50 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने विकण्याची व्यवस्था आहे. दिनांक 15 मे 2024 पर्यंत मंत्रालयाकडून या संस्थांना 2 लाख 51 हजार 220 मेट्रिक टन गहू आणि 2 लाख 03 हजार 531 मेट्रिक टन तांदूळ वितरीत केला गेला आहे, यासोबतच या संस्थांनी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमधून 1 लाख 47 हजार 900 मेट्रिक टन गहू आणि 83 हजार 113 मेट्रिक टन तांदळाचा साठा स्वतःहून घेतला आहे.