सध्या राज्यभरातील बाजारात फळांची मागणी वाढली असून गलोगल्ली, चौकात हातगाड्यावर फळे विकल्या जात आहेत. त्यात मागील काही दिवसांपासून संत्र्यासारखे दिसणारे 'किन्नू' नावाचे फळ मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. एरव्ही मोसंबीपेक्षा जास्त भावात विकणारे हे फळ आता अवघ्या ४० रुपये किलोने विकल्या जात आहे.
नागपूरची संत्री तर तुरळक दिसते आहे. किन्नू आकर्षक व स्वस्तही असल्याने शहरवासी हे आरोग्यदायी फळ खरेदी करीत आहे. दरम्यान बाजारात किन्नू फळ ४० रुपये किलो, तर मोसंबी ७० रुपये किलो दराने किरकोळ बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना या दोन्ही फळांतील फरक कळत नसल्याने ग्राहकांची गोची होत आहे.
संत्री व किन्नूमध्ये काय फरक आहे?
शहरात हातगाड्यावर किन्नूला संत्री म्हणूनच विकल्या जात आहे. कारण, अनेक नागरिक असे आहेत त्यांना संत्री व किन्नूमधील फरक माहीत नाही.
तसेच संत्रा व किन्नू हे दोन्ही फळ दिसायला सारखेच असतात. दोन्हीमधील तफावत पटकन लक्षात येत नाही.
दोन्ही फळ लिंबूवर्गीय आहेत. यामुळे यात व्हिटॅमिन, अँटीऑक्सीडेंट आणि खनिज जास्त प्रमाणात आढळतात.
संत्रीचे साल ही पातळ असते व वजनातही हलकी असते. तर किन्नूची साल ही थोडी जाड असते व फळ थोडे वजनदार असते.
शेतकऱ्यांचे नुकसान
राजस्थान येथील श्रीगंगानगर परिसरात यंदा बंपर उत्पादन झाले. तेथे जागेवर १० रुपये किलोने किन्नू विकल्या जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शहरात किन्नू ४० रुपये किलो विकत असून आजघडीला मोसंबी ६० ते ७० रुपये किलोने विकत आहे. दरवर्षी किन्नू ८० रुपये दरम्यान विकत असते.
किन्नू फळाची लागवड पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर येथील हवामान किन्नू उत्पादनासाठी सर्वोत्तम मानले जाते. आता राजस्थानमध्ये किन्नू उत्पादनाचे प्रयोग यशस्वी झाले आहे.
संत्री आणि मोसंबीचे दर वाढले...
संत्री व मोसंबीचे दर अवघ्या वीस दिवसांत वाढले असून मागील महिन्यात संत्रा 50 रुपये तर मोसंबी साठ रुपये किलो होती, पण आवक कमी झाल्याने भाव वाढले. त्यामुळे नेमक्या उन्हाळ्यात या दोन फळांचा ज्यूस पिणे महाग होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे यावर्षी बंपर उत्पादन झाले असताना नाशिकमध्ये मात्र मोसंबी आणि संत्री महाग मिळताना दिसत आहे. विदर्भातील अकोला अमरावतीत दर नाशिकच्या तुलने4 40 ते 50 रुपयांनी स्वस्त आहे. येथे आवक कमी झाल्याचे प्रमुख कारण व्यवसायिकांनी सांगितले.