Join us

Soyabean Market : बुलढाणा जिल्ह्यात नव्या सोयाबीनची आवक, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 6:07 PM

Soyabean Market : राज्यातील बाजार समित्यामध्ये सोयाबीनला सरासरी काय भाव मिळतोय? आणि नव्या सोयाबीनला काय भाव मिळतोय?

Soyabean Market : बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) लोणार तालुक्यातील बिबी येथील जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये नव्या सोयाबीनला 4 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.  या ठिकाणी चोरपांग्रा येथील अशोक डहाळके यांनी सोयाबीनची काढणी करून विक्रीस आणले होते त्यांच्या. यावेळी त्यांच्या सोयाबीनला साडेचार हजार रुपये भाव देण्यात आला. या हंगामातील प्रथमच सोयाबीन बाजारात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्याचा गणेश गाडे यांनी सत्कार केला.

शेतकरी डहाळके यांनी सहा क्विंटल एक किलो असा माल विक्रीस आणला होता. गत काही दिवसांपासून सोयाबीनच्या (Soyabean Market) भावात तेजी येत असल्याचे दिसून येत आहे. नवीन सोयाबीनला साडेचार हजार दर मिळाल्याने पुढील दिवसांत दर आणखी वाढावेत, अशी अपेक्षा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

नियमित होणाऱ्या पावसामुळे, तसेच वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकाला पुरेसे दाणे भरले नसून, शेंगांची संख्या कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झालेली आहे. त्यामुळे पेरणी, खते, औषधी, कापनी, आंतरमशागत, मजुरी याचाही खर्च फिटत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तरी शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्याची गरज आहे. अशोक डहाळके, शेतकरी.

सोयाबीनची आधारभूत किमत 4892

केंद्र शासनाने खरीप हंगाम 2024 मध्ये पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केलेल्या आहेत. त्यानुसार पिवळा सोयाबीनला 4 हजार 892 रुपये असा भाव आहे. यापेक्षा अधिक भाव सोयाबीनला मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. शासकीय व खासगी बाजार समितीमध्ये आजमितीस सोयाबीनच्या भावात तेजी येत आहे. मात्र, सोयाबीनची आवक वाढल्यानंतर नेमके भाव काय राहतील, यावर शेतकऱ्याचे आर्थिक गणित अवलंबून राहणार आहे.

बाजारातील आजचे बाजारभाव 

आज सोयाबीनची 24 हजार 229 क्विंटलची आवक झाली. तर अहमदनगर बाजारात सोयाबीनला 4 हजार 263 रुपये, अकोला जिल्ह्यात पिवळ्या सोयाबीनला 4 हजार 305 रुपये, अमरावती जिल्ह्यात 4 हजार 250 रुपये, बीड जिल्ह्यात 4 हजार 311 रुपये, धाराशिव जिल्ह्यात 4 हजार 376 रुपये, हिंगोली जिल्ह्यात 4 हजार 425 रुपये, लातूर जिल्ह्यात 4 हजार 331 रुपये दर मिळाला. एकूणच सोयाबीनला 4 हजार 300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे.

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डबुलडाणा