- सुनील चरपे
नागपूर : सध्या साेयाबीनचे बाजारभाव एमएसपीच्या (Soyabean MSP) खाली असून, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३,८०० ते ४,५०० रुपये दरम्यान साेयाबीन विकावे लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित आहे. हा दर मिळण्यासाठी साेया ढेपेचे दर किमान पाच हजार रुपये असायला हवे. त्यासाठी साेया ढेपेची आयात थांबवून निर्यात वाढविणे आणि निर्यातीला सबसिडी देणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारने सन २०२४-२५ च्या हंगामासाठी साेयाबीनची (Soyabean Market) एमएसपी ४,८९२ रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे. सध्या शेतकऱ्यांना ३,८०० ते ४,५०० रुपये दराने साेयाबीन विकावे लागत असून, त्यांना एमएसपीपेक्षा प्रति क्विंटल ३९२ ते १,०९२ रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने अद्याप साेयाबीन खरेदी केंद्र देखील सुरू केलेले नाहीत.
मध्य प्रदेशातील शेतकरी साेयाबीनला किमान सहा हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी करीत आहेत. हा मिळण्यासाठी साेया ढेपेचे दर किमान पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत पाेहाेचणे आवश्यक आहे. त्यासाठी साेया ढेपेची आयात थांबवून निर्यात वाढविणे आणि त्याला सबसिडी देणे आवश्यक आहे, असे मत शेतमाल बाजारतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे.
जागतिक बाजारात कमी दर
जागतिक बाजारात सध्या साेयाबीनचे दर १० डाॅलर प्रति बुशेल म्हणजे ३,०२४ रुपये प्रति क्विंटल तर साेया ढेपेचे दर ३११ डाॅलर प्रति टन अर्थात ३१ डाॅलर म्हणजेच २,६०४ रुपये प्रति क्विंटल आहे. कमी दरामुळे ढेपेची आयात वाढणार असून, देशांतर्गत बाजारातील साेयाबीनचे दर आणखी दबावात येणार आहेत.
भारताच्या तुलनेत जागतिक बाजारात साेयाबीन व ढेपेचे दर खूप कमी आहे. त्यामुळे आयातीचा धाेका वाढला आहे. खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क लावल्याने साेयाबीनच्या दरावर फारसा परिणाम हाेत नाही. साेयाबीनला किमान सहा हजार रुपये मिळावा, यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययाेजना करायला हव्या.
- विजय जावंधिया, शेतमाल बाजारतज्ज्ञ.