Join us

उन्हाळ बाजरी काढणीला वेग, कुठल्या बाजरीला सर्वाधिक बाजारभाव, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 6:00 PM

उन्हाळी हंगामातील बाजरी काढणीची लगबग सुरू आहे. कसा मिळतोय बाजारभाव?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात उन्हाळी हंगामातील बाजरी काढणीची लगबग सुरू आहे. शेतकरी कामात व्यस्त आहेत. उन्हाळी भुईमूग व बाजरी रब्बी हंगामातील हे शेवटचे पीक आहेत. बाजरी या पिकाला मात्र हवा तसा भाव नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. परंतु, तरीही मका आणि ज्वारीपेक्षा बाजरीला प्रतिक्विंटल २५० रुपये भाव जास्त असल्याने बाजरी भाव खातेय असे दिसून येत आहे.

तीव्र उन्हाळ्यात येणारे बाजरी हे पीक असल्याने शेतकरी दोन पैसे मिळावे यासाठी तिसरे पीक घेण्यासाठी शेतकरी बाजरीला पसंती देतात. मात्र, तीव्र ऊन असल्यामुळे बाजरी कापणी व काढण्यासाठी मजूर सहजासहजी तयार होत नाहीत. असे असले तरी बाजरीचे शेत हे सर्व बाजरी काढून देण्याच्या अटीवर दिले जात आहे. मजूर दोन पैसे जास्त मिळतील म्हणून बाजरी काढण्याची कामे करतात. अनेक शेतकरी एप्रिल महिन्याच्या शेवटी बाजरीचे उत्पन्न घेऊन शेत नांगरटी करणे, ट्रीलर करणे यासाठी प्राधान्य देत आहेत. तर  25 मे नंतर पुन्हा संकरित कापसाच्या लागवडीची लगबग सुरू होणार आहे. म्हणून आता शेतकऱ्यांची शेताची मशागत करून ठेवणे व शेणखत टाकण्याची कामे सुरू आहेत.

बाजरीला दोन हजारांच्या वर भाव

चोपडा तालुक्यात बाजरीची लागवड ८०० हेक्टर क्षेत्रावर आहे. सध्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीची आवक वाढली आहे. दररोज जवळपास साडेचारशे ते पाचशे क्चिटल बाजरी विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. बाजरीला कमीत कमी प्रतिक्विंटल २ हजार २३१ रुपये तर, जास्तीत जास्त २ हजार ३३१ रुपये असा भाव मिळत आहे. बाजरीच्या तुलनेत मक्याला प्रतिक्विंटल केवळ १ हजार ८०० रुपये ते दोन हजार रुपये भाव मिळत आहे, ज्वारीला प्रतिक्विंटल दोन हजार पये ते २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. म्हणून मका आणि ज्वारीच्या तुलनेत बाजरीला सध्यातरी जास्त भाव मिळत असल्याचे दिसत आहे तसेच, भुईमुगाच्या ओल्या शेंगांना प्रति क्विंटल साडेसातशे ते आठशे रुपये भाव असून काही ठिकाणी शेतकरी खासगीत शेंगा विक्री करीत आहेत.

आजचे बाजरीचे दर

आजचे बाजरीचे दर पाहिले असता सिल्लोड बाजार समिती सर्वसाधारण बाजरीला सरासरी 2250 रुपये दर मिळाला तर शेवगाव बाजार समितीत हायब्रीड बाजरीला 2600 रुपये दर मिळाला. कालचे जर बाजार भाव पाहिले तर अमरावती बाजार समितीत 26 ते 75 रुपये, जालना बाजार समितीत हिरव्या बाजरीला 25000 रुपये, पैठण बाजार समितीत हिरव्या बाजरीला 2640 रुपये, माजलगाव बाजार समितीत हायब्रीड बाजरीला 2561 रुपये, पुणे बाजार समितीत महिको बाजरीला सर्वाधिक तीन हजार पन्नास रुपये दर मिळाला.

टॅग्स :शेतीमार्केट यार्डजळगावशेती क्षेत्र