जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झालेल्या भडगावात शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा लाभ उठवत चारा देणारी पिके घेतली आहेत. त्यामुळे भडगावात यंदा चांगला चारा उपलब्ध झाला आहे. या तालुक्यातून चारा नजीकच्या तालुक्यांना व परजिल्ह्यांतही पाठवला जात आहे. दुष्काळी परिस्थिती असताना त्यावर मात करत शेतकऱ्यांनी केलेल्या शेतीच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.
यावर्षी खरीप हंगामातून शेतकऱ्यांच्या हाताला म्हणावे असे काही लागले नाही. पाऊस कमी झाल्याने यंदा शासनाने भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला. मात्र नंतरच्या अवकाळी पावसामुळे रब्बी व उन्हाळी हंगामात आलेल्या दुष्काळावर मात करीत शेतकऱ्यांनी चारा वर्गीय पिके घेतली. यात दादर, ज्वारी त्याखालोखाल मका व बाजरी आदी पिके घेण्यात आली. दुष्काळी स्थिती पाहून शेतकऱ्यांनी ऐनवेळेस नियोजनात केलेल्या बदलामुळे चाऱ्याची टंचाई दूर झाली आहे. त्यामुळे दुष्काळी तालुका असून, मार्च ते एप्रिल व आता सुरू झालेल्या मे महिन्यात दररोज शेकडो टन चारा जवळच्या तालुक्यात व जिल्ह्यात रवाना होत आहे.
यात चाळीसगाव, मालेगाव तसेच धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्यातील लगतच्या भागांचा समावेश आहे. दररोज १०० ट्रॅक्टरच्या जवळपास चारा याठिकाणी पाठवला जात आहे. धान्याबरोबरच चारा विकून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना त्यावर मात करत शेतकऱ्यांनी केलेल्या शेतीच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे. यावर्षी रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामाचे २ ते ३ टप्पे झाल्याने चारा निघण्याचा कालावधी वाढला आहे. शिवाय हे दोन्ही हंगाम १ महिन्याआधी आल्याने चाऱ्याची उपलब्धता व वाहतूक तसेच चारा विक्रेते व खरेदीदार यांना सोयीचे झाले आहे. त्यामुळे एकाचवेळी चारा न विकता टप्प्याटप्प्याने चारा विक्री केली जात आहे.
व्यापारी तळ ठोकून
सध्या उन्हाळी बाजरीची कापणी सुरू आहे. त्यानंतर बाजरीचा चाराही उपलब्ध होईल. सुरुवातीला १ हजार रुपये ते दीड हजार रुपये शेकडा पेंडी असा बाजरीच्या चाऱ्याचा दर आहे. मात्र, बाजरीच्या पेरणीचे क्षेत्र त्यामानाने कमी आहे, शिवाय भाकड जनावरे हा चारा खात असल्याने गोशाळा व भाकड जनावरे पाळणारे शेतकरी हा चारा घेत आहेत. चाऱ्याची खरेदी व विक्री करणारे व्यापारी भडगाव तालुक्यात सध्या तळ ठोकून आहेत.
असे आहेत चाऱ्याचे दरसुरुवातीला ३ हजार रुपये शेकडा पेंढी, असा ज्वारीचा चारा विक्री झाला. त्यानंतर तो २२०० ते २३०० रुपये शेकडा भावाने विक्री झाला. आता पुन्हा शेतकरी चाऱ्याची साठवणूक करीत असल्यामुळे ज्वारीच्या कडब्याचे दर वधारले आहेत. आज ज्वारीचा चारा २ हजार ५०० रुपये शेकडा दराने विक्री होत आहे. ज्वारीचे दर कमी तर चाऱ्याचे दर तेजीत आहेत. मक्याचा चारादेखील परजिल्ह्यात जात आहे. ५ ते ७ हजार एका वाहनामागे असा मक्याच्या चाऱ्याचा दर आहे. ज्वारी काढल्यानंतर उरणारी धान्याची भुस्सी ५ हजार ते ६ हजार रुपये भावाने विकली जात आहे.