- संजय सोनवणे
जळगाव : सततच्या पावसामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या वांग्याची (brinjal Market Price) भाजीच आता बाजारातून गायब झाली आहे. पावसामुळे वांग्याची रोपे बसली असून त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा फटका व्यापारी आणि ग्राहकांनाही बसला आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या बाजारपेठेत वांग्यांचा दर २०० रुपयांपर्यंत गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासूनच्या पावसामुळे पांढऱ्या वांग्याची रोपे बसून गेल्याने बाजारातून वांगे गायब झाले आहेत. त्यामुळे वांग्याचा भाव वाढला आहे. सध्या पांढरे वांगे भाव खात असून किलोला २०० रुपयांपर्यंत त्यांचा भाव वाढला आहे. किलोसाठी वांग्याचा भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वधारल्याने बाजारात वांगे गायब झाले आहे. त्यामुळे वांगे खाणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. भाजीपाला बाजारात सर्वच पालेभाज्या व इतर फळभाज्या ६० ते ८० रुपये किलो दराने मिळत असताना वांगी बाजारातून गायब झाली आहेत.
दरम्यान २०० रुपये किलो दर देऊनही वांगी उपलब्ध होत नसल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत. सततच्या रिपरिप पावसामुळे वांग्याची झाडी सडून गेल्याने यंदा वांग्याला फटका बसला आहे. याबाबत शेतकरी रमेश एकनाथ चौधरी म्हणाले की, सततच्या पावसामुळे सर्वच भाजीपाला शेतकऱ्यांनी वांगी लागवड केली होती. मात्र सर्व वांग्याची झाडे अतिपावसामुळे बसले व उत्पन्न खूप प्रमाणात घटले. त्यामुळे वांग्याचे भाव सध्या वधारलेले आहेत.
वांग्याची आवक घटली
सततच्या पावसामुळे सगळीकडे वांग्यांच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वांगी बाजारात येत नाहीत. आडगाव येथून आठवड्यातून दोन दिवस वांगी येतात. बाजारात वांगी दररोज लिलावासाठी ५० ते ६० कॅरेट येत असायचे. आता मात्र एक ते दोन दिवसाआड ५ ते ६ कॅरेट वांगी बाजारात येत आहेत. त्यामुळे ज्या दिवशी वांगी बाजारात येतात, त्यादिवशी वांग्याला १०० रुपयांचा भाव मिळतो. ज्या दिवशी वांगी येत नाहीत, त्यादिवशी मात्र वांग्याचा भाव २०० रुपयांपर्यंत जातो. सध्या चोपडा बाजारपेठेत वांग्याची आवक खूपच कमी आहे.
-ईश्वर चौधरी, भाजी व्यापारी, चोपडा
वाचा आजचे बाजारभाव
आज अकलूज बाजारात सर्वसाधारण वांग्याला सरासरी प्रतिक्विंटल 04 हजार 500 रुपये, अहमदनगर बाजारात 2750 रुपये, श्रीरामपूर बाजारात 03 हजार रुपये, तर राहता बाजार 2500 रुपये दर मिळाला. तर कल्याण बाजारात हायब्रीड वांग्याला 3000 रुपये मुरबाड बाजारात चार हजार पाचशे रुपये दर मिळाला. तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल वांग्याला 02 हजार रुपये, पुणे बाजारात 2750 रुपये, मुंबई बाजार 2800 रुपये, मंगळवेढा बाजार 04 हजार 600 रुपये दर मिळाला.