Join us

Gold And Cotton Rate : पिवळे सोने चकाकले तर पण पांढरे सोने काळवंडले, कसे आहेत बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 2:23 PM

आजघडीला बाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहापटीच्या आसपास दर मिळत आहे.

चंद्रपूर : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या लांब धाग्याच्या कापसाचा यंदा सात हजार २० रुपये हमीभाव आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत प्रतिक्विंटल सात हजार २०० रुपयांपर्यंत दर स्थिरावले आहेत. याउलट पिवळ्या सोन्याने मात्र गगनभरारी घेतली असून, आजघडीला बाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहापटीच्या आसपास दर मिळत आहे. त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र फिके पडल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाठ खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा आता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे आभूषण म्हणून सोन्याला महिला अधिक पसंती देतात. गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी केली जाते. दिवसेंदिवस दर वाढत असले तरी सोन्याची उलाढाल काही कमी झालेली दिसत नाही. एकेकाळी प्रतितोळा (दहा ग्रॅम) सोने आणि प्रतिक्विंटल कापसाचे भाव सारखेच होते. पण, कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेले अन् कापसाचे भाव अनेक वर्षे स्थिरावलेलेच राहिले. 

मागील दहा- बारा वर्षात कापसापेक्षा सोन्याचे भाव अधिक पटीने, झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत वाढल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. एकेकाळी सोने अन् कापसाला सारखाच भाव होता. त्यामुळे कापसाला पांढरे सोने अशी उपमा दिली जायची. मात्र, कालांतराने सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत गेली. अन् कापसाचे दर जैसे-थेच राहिले. त्यामुळे आता सोने अन् कापूस यांच्या दरात जमीन-आसमानचा फरक दिसून येत आहे.

सोने आणि कापसाला काय भाव? 

आज कापसाला सरासरी 7000 रुपये ते 7200 रुपये भाव मिळाला. अमरावती बाजार समितीत सरासरी 7000 रुपये दर मिळाला. वरोरा-माढेली  बाजार समितीत सरासरी 7100 रुपये दर मिळाला. तर देउळगाव राजा बाजार समितीत 7200 रुपये दर मिळाला. तर आज 22 कॅरेट सोन्याचा प्रतिग्रॅम दर 6,808 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 7,427 रुपये  आहे. (हे दर अधिकृत संकेस्थळावरून घेतले आहेत.)

खरीप हंगामात कापसाच्या पिकाला अतिवृष्टी, पावसाचा खंड व अवकाळी पावसाचा फटका बसला. सोबतच रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे उतारा कमी झाला. त्यातही पाहिजे त्या प्रमाणात भावच मिळाला नाही. परिणामी लागवडीचा खर्चही निघाला नाही. एकेकाळी कापूस अन् सोन्याचे दर सारखे होते. मात्र आता सोन्याचे दर वाढत आहेत. याउलट कापसाचे दर जैसे-थेच आहेत.

- वसंता जेनेकर, शेतकरी

टॅग्स :शेतीसोनंकापूसमार्केट यार्डनागपूर