यवतमाळ : यंदा भुईमुगाचा उतारा घटला असून दरही घटल्याचे चित्र आहे. गतवर्षी सात हजार रुपये क्विंटल असलेले भुईमुगाचे दर यावर्षी साडेचार ते सहा हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळे क्विंटलमागे हजार रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. एकीकडे अस्मानी संकटाना तोंड देत शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाचे उत्पादन घेतले. मात्र एकीकडे उत्पादन घटले असून दरही कोसळले असल्याचे दिसून येत आहे.
रब्बी हंगामातील भुईमूग काढणीची लगबग सुरु असून अनेक भागात बाजार समित्यांमध्ये देखील भुईमूंग दाखल होऊ लागला आहे. गतवर्षी भुईमुगाचे दर अधिक होते. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी नऊ हजार ७४६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी भुईमुगाची लागवड केली; मात्र यावर्षी खुल्या बाजारात भुईमुगाचे दर कोसळले आहेत. विशेष म्हणजे सततच्या बदलत्या वातावरणाने शेतकऱ्यांच्या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. भुईमुगाचा उतारा घटल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान भुईमूग बियाणे, खत, निंदणी आणि भुईमूग काढणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून भुईमूग विक्री करून मिळणारे दर शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत. यातून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भुईमुगातून मिळणाऱ्या पैशावरच शेतकऱ्यांचे खरिपातील गणित अवलंबून आहे. याच ठिकाणी दराला मोठा फटका बसल्याने कर्जाची परतफेड करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दर वाढतील या आशेने थांबले तर पुढील हंगामात पेरणी करायची कशी हा मोठा प्रश्न आहे. मिळेल त्या दरात शेतकरी भूईमूग विक्रीसाठी बाजारात येत आहे. यातूनच बाजारात गर्दी वाढली आहे. याचवेळी दर दबावात आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
एकरी तीन क्विंटलचाही उतारा आला नाही!
शेतकरी सुरेंद्र काटे म्हणाले कि, भुईमुगाचे पीक मेहनतीला न परवडणारे आहे. यात भुईमूग काढणीसाठी मजूरही मिळत नाहीत. यामुळे शेतकरी अधिकच धास्तावले आहे. शेतमालास किमान चांगले दर मिळाले तरी पावले. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर शेतकरी आशिष सूरजुसे म्हणाले कि, यावर्षी शेतकऱ्यांना एकरी तीन क्विंटलचाही उतारा आला नाही. सोबत भुईमूग काढणीचा खर्चही अधिक आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांना सर्वाधिक मेहनत घ्यावी लागते. हातात पैसे उतरच नाही. गतवर्षीइतकेच दर अपेक्षित होते.
आजचे भुईमुगाचे दर
आज बाजार समितीमध्ये भुईमूग सुक्या शेंगांना छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सरासरी 4 हजार 150 रुपये, कारंजा बाजार समितीत 5 हजार 830 रुपये तर अमरावती बाजार समितीत लोकल शेंगांना 6 हजार 25 रुपये दर मिळाला.
त्यानंतर आज भुईमुंगाच्या ओल्या शेंगांना भुसावळ बाजार समितीत 5 हजार रुपये तर राहता बाजार समितीत 4 हजार 200 रुपये दर मिळाला. त्यामुळे मागील वर्षी सरासरी 6 हजार 500 रुपये ते 7 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र यंदा हा दर सहा हजार रुपयांच्या खाली असल्याचे दिसून येत आहे.