Join us

गवार खातेय भाव, लाल अन् हिरव्या मिरचीचं काय? जाणून घ्या आजचे भाजीपाला दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 8:08 PM

आज बाजार समित्यामध्ये कुठल्या भाजीला सर्वाधिक भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

फळपिकांबरोबरच भाजीपाला आवक देखील बाजार समितीमध्ये होत असून सद्यस्थितीत गवार, मिरची, कैरी, काकडीला चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र इतर भाजीपाल्याला अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आजच्या बाजार अहवालानुसार भाजीपाल्यामध्ये बटाट्याची सर्वाधिक 6 हजार क्विंटलची आवक झाली. त्या खालोखाल लसूण आणि फ्लॉवरची आवक झाल्याचे दिसून आले. 

आज 06 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पुणे बाजार समितीत बटाट्याची सर्वाधिक आवक झाली. या बाजार समितीत प्रति क्विंटलला सर्वाधिक सरासरी 1700 रुपये दर मिळाला. तर बटाट्याची सर्वात कमी आवक सातारा बाजार समितीत झाली. तर सर्वात कमी बाजारभाव नागपूर बाजारसमितीत 1300 रुपये मिळाला. भेंडीला प्रति क्विंटलला सरासरी 3200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर भेंडीच्या हायब्रीड वाणाला सरासरी 4 हजार 500 रुपये दर मिळाला. फ्लॉवरला सर्वाधिक सरासरी 1875 रुपये भाव नागपूर बाजारसमितीत मिळाला. मात्र इतर बाजार समित्यांमध्ये केवळ सहाशे रुपयांपासून दर मिळाला. 

दरम्यान गवारचा भाव सध्या तेजीत असून लोकलला सरासरी 2 हजार रुपये तर हायब्रीडला सरासरी 8 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सर्वाधिक भाव नाशिक बाजार समितीत मिळाला आहे. काकडीची आवक कमी असून सर्वाधिक भाव नंबर एक आणि हायब्रीड वाणाला मिळत आहे. पनवेल बाजार समितीत सरासरी क्विंटलला 1750 रुपये बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सर्वात कमी भाव मिळाला. पुणे बाजार समितीत कोथंबीरीच्या जवळपास एक लाखाहून अधिक जुड्या दाखल झाल्या. या ठिकाणी जुडीला सरासरी सात रुपये दर मिळाला. तर कोल्हापूर बाजार समितीत क्विंटलला 2500 रुपये दर मिळाला. तर मेथीच्या जुडीला सरासरी आठ रुपयांचा दर मिळाला. आज पुणे बाजार समितीत सर्वाधिक 37 हजार जुड्यांची आवक झाली होती. 

लसूण खातोय भाव 

दरम्यान सर्व भाजीपाल्यामध्ये लसूण भाव खात असून आज सरासरी प्रति क्विंटलला 9 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. पुणे    बाजार समितीत 477 क्विंटलची  आवक झाली. या बाजार समितीत सर्वाधिक 11 हजार 500 रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत हायब्रीड वाणाची 96 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी क्विंटलला 7500 रुपये दर मिळाला. 

हिरवी अन् लाल मिरचीचं काय?

आज बाजार समित्यांमध्ये हिरव्या मिरचीला प्रति क्विंटलमागे सरासरी 4 हजार 500 रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला. आज सर्वाधिक 6500 रुपयांचा बाजारभाव ज्वाला या वाणाला मुंबई बाजारसमितीत मिळाला. तर सर्वात कमी 3 हजार 350 रुपयांचा बाजारभाव नागपूर    बाजार समितीत मिळाला. तर लाल मिरचीची सर्वाधिक आवक मुंबई बाजार समितीत झाली. या बाजार समितीत सरासरी प्रति क्विंटल 31 हजार रुपये दर मिळाला. तर लाल मिरचीच्या हायब्रीड वाणाला 14 हजार रुपयांचा दर मिळाला. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीबाजारमार्केट यार्डभाज्यामिरची