Soyabean Market : वर्षभरात कधीतरी सोयाबीनचे भाव वाढतील (Soyabean Market) या अपेक्षेने मागील वर्षी साठवणूक केलेल्या सोयाबीनला वर्षभर चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी साठवणूक केलेली सोयाबीन वणी बाजारात विक्री करण्यासाठी आणल्याने काही प्रमाणात आवक वाढली असली तरी भाव मात्र साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आतच मिळत असून, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे गव्हाचे दर वाढले (Wheat Market) असून, तीन हजारांच्या आसपास गहू विकला जात आहे.
जून महिन्यात पेरणी केलेली सोयाबीन (Soyabean Sowing) ऑक्टोबर महिन्यात काढणीसाठी येते. जून महिन्यात पेरणी करावी लागत असते. शिवाय इतर नगदी पिकांच्या लागवडीसाठी भांडवल गरजेचे असते. त्यामुळे शेतकरी साठवणूक केलेले सोयाबीन या दिवसात विक्रीसाठी आणतात. पीक कर्ज मिळत नाही, शिवाय या दिवसात मुलांच्या शाळेचा खर्च करावा लागतो. त्यामुळे तत्काळ सोयाबीन बाजारात विक्री करतात आणि आपल्या गरजा पूर्ण करत असतात; पण मागील वर्षी जेमतेम भाव असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नाही. आज ना उद्या भाव वाढतील, या अपेक्षेने घरात सोयाबीन साठवून ठेवले; पण आज जवळपास आठ महिने उलटून गेले तरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. तेव्हा जो दर होता तोच आज असल्याने एक वर्ष थांबूनसुद्धा सोयाबीन त्याच भावात विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शिवाय वर्षभर सोयाबीन पडून राहिल्याने घट झाली आहे.
गव्हाची दरवाढ
मागील वर्षी जेमतेम पाऊस पडला होता. त्यामुळे गहूचे उत्पादन कमी झाले. शेतकऱ्यांनी पाणी नसल्याने गहू पेरणी कमी केली. त्याचा परिणाम म्हणून आज वर्षभर गव्हाला चांगला भाव मिळत आहे. आज तीन हजारांच्या पुढे घाऊक बाजारात गहू विकला जात आहे; परंतु गहू हा व्यापाऱ्यांकडे जास्त आहे. शेतकऱ्यांनी गहू मार्च महिन्यात विकून टाकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या भाववाढीचा फायदा होताना दिसत नाही. जून व जुलै महिन्यात नवीन हंगाम सुरू होतो, तेव्हा शेतीला मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. त्यावेळेस शेतात सर्व नवीन पीक उभी करावी लागत असतात. त्यामुळे या दिवसात भांडवल गरजेचे असते. म्हणून सोयाबीनला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती; पण वर्षभर सोयाबीनचे दर वाढले नाही. उलट भावात घट होऊन आज सोयाबीन तोट्यात विक्री करावी लागत आहे.
असे आहेत बाजारभाव
आज सोयाबीनला सिल्लोड बाजारात सर्वसाधारण सोयाबीनला 4400 रुपये, बाजारात पिवळ्या सोयाबीनला 04 हजार 424 रुपये, तर बुलढाणा बाजारात 4 हजार 150 रुपयांचा दर मिळाला. तर गव्हाला बुलढाणा बाजारात हायब्रीड गव्हाला 2400 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत अर्जुन गव्हाला 2500 रुपये, लातूर बाजारात 2189 गव्हाला 2950 रुपये तर पुणे बाजारात 2900 रुपयांचा दर मिळाला.