उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली असून लाल कांदा पेक्षा उन्हाळ कांद्याला काहीसा समाधानकारक भाव मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक पाहायला मिळाली. लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 1700 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. काल रविवार असल्याने काहीच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. त्यानुसार रामेटक बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळ सत्रात लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे.
दरम्यान लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळ सत्रात उन्हाळ कांद्याची 20 वाहनांची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 1700 रुपये बाजारभाव मिळाला आहे. तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची 400 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमी कमी 1450 रुपये तर सरासरी 1650 रुपये इतका भाव मिळाला. एकीकडे कांदा निर्यात बंद असल्यापासून कांद्याचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता उन्हाळ कांदा देखील बाजारात येत असल्याने या कांद्याला तरी चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. तसेच लासलगाव अंतर्गत येणाऱ्या निफाड उपबाजार आवारात देखील उन्हाळ कांद्याची आवक झाली असून या ठिकाणी कमीत 1101 रुपये तर सरासरी 1680 इतका बाजारभाव मिळाला आहे.