अहमदनगर :अहमदनगर बाजार समितीमध्ये सध्या चिंचोक्यांची चांगली आवक होत आहे. चिंचोक्यांच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या बरोबरीने चिंचोक्यांना भाव मिळत आहे. मागील वर्षी चिंचोक्यांना प्रतिक्विंटल १५०० ते १६०० रुपये इतका भाव होता. यावर्षी हे भाव ३ हजार १०० पर्यंत वाढले आहेत.
जुन्या काळात चिंचोक्यांना महत्त्व कमी होते. त्यावेळी 'आम्ही पैसे मोजले, चिंचोंके नाही', अशी म्हण प्रचलित होती. यावरून त्याकाळी चिंचोक्यांना खूपच कमी असल्याचे स्पष्ट होते. मात्र आता घरातील अन्नधान्याच्या बरोबरीने चिंचोक्यांना भाव मिळत आहेत. अहमदनगर बाजार समितीत काही व्यापारी शेतकऱ्यांकडून चिंचोके विकत घेतात. गेल्या महिन्यात अहमदनगर बाजार समितीत दोन ते अडीच हजार डाग (गोण्या) आवक होत होती. सध्या चिंचांचा सिझन संपत असल्याने सध्या बाजारात ४०० ते ५०० डाग आवक सुरू आहे.
मागील वर्षी चिंचोक्यांना प्रतिक्विंटल १५०० ते १६०० रूपये इतका भाव होता. यावर्षी मात्र हे भाव ३ हजार १०० पर्यंत वाढले आहेत. नगर बाजार समितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनही चिंचोक्यांची आवक होत आहे. सध्या नगरच्या बाजारात चिचोक्यांना खूप मागणी आहे. मात्र त्या प्रमाणात आवक कमी आहे. त्यामुळे चिंचोक्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. सध्याची मागणी पाहता हे भाव स्थिर राहतील.
- आनंद चोपडा, चिंचोका, व्यापारी, अ.नगर
चिंचोक्यांचा उपयोग कशासाठी ?चिंचोक्यांचा उपयोग सुपारी तयार करणे, स्टार्च पावडर तयार करणे, कुंकू बनविणे तसेच इतर उद्योग व्यवसायातही उपयोग होतो. त्यामुळे चिंचोक्यांची मागणी उद्योगजगतातून वाढली आहे. तसेच शरीरातील ताकद वाढविण्यासाठी भाजलेला चिचोका मधात उगाळून खातात. चिचोक्यात अनेक पोषक तत्त्वे, प्रथिने, जीवनसत्वे, भरपूर प्रमाणात खनिजे असतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोग होतो.