गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिकांसह तीळ (Seasame) व सोयाबीन (Soyabean) पिकाचेही उत्पादन घेतले जाते. एकेकाळी धान पिकानंतर सोयाबीनचा पेरा होता; परंतु यंदा सोयाबीन पिकाचा पेरा ३८८.८० हेक्टरपर्यंत घटला असून, त्या तुलनेत तीळ पिकाचे क्षेत्र वाढलेले आहे. जिल्ह्यात सध्या ६०४.२५ हेक्टर क्षेत्रावर तीळ पिकाची लागवड केलेली आहे. सध्या तिळाचा दर १२ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
दिवाळी सणात वाढणार भाव?
दिवाळी सणातच तिळाचे (Til Production) उत्पादन सुरू होते. या कालावधीत शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो. सध्या भाव चांगला आहे. हाच दर कायम राहील का? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. खुल्या बाजारात तिळाचे दर १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या वर असले तरी किरकोळ बाजारात मात्र तिळाचे दर दुप्पट आहेत. पाकीटबंद तिळाची २५० रुपये किलोप्रमाणे विक्री केली जाते.
शेतीच्या पाळ्यांवर आम्ही तिळाची लागवड करतो. उत्पादनानंतर घरी आवश्यक प्रमाणात तीळ ठेवून खुल्या बाजारात उर्वरित तिळाची विक्री करतो. बाजारात तिळाला चांगला भाव आहे.
- विनोद चापले, शेतकरी
आजचे तिळाचे बाजारभाव
आजचे तिळाचे बाजारभाव पाहिले असता, कारंजा बाजार समितीत सर्वसाधारण तिळाला 11 हजार 205 रुपये दर मिळाला. तर गज्जर तिळाला यवतमाळ बाजारात 10 हजार 775 रुपये तर हिंगणघाट बाजारात 10 हजार 550 रुपये दर मिळाला. आज गोपी तिळाला अमळनेर 11 हजार 500 रुपये तर लोकल तिळाला अकोला बाजारात 11 हजार 200 रुपये, मुंबई बाजारात तब्बल 16 हजार रुपये, अमरावती बाजारात पांढऱ्या तिळाला 11 हजार 400 रुपये, दिग्रस बाजारात 10 हजार 780 रुपये, कल्याण बाजारात सर्वाधिक 19 हजार रुपयांचा भाव मिळाला.