धुळे : पारंपरिक पिकांतून मिळत असलेल्या अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. रात्रंदिवस हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत मळा फुलविला; मात्र तोडणी करून बाजारात येताच मिळत असलेल्या कवडीमोल दराने टोमॅटोची लालीच फिकी झाली. शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
साक्री तालुक्यातील म्हसदीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी टोमॅटोची लागवड केली. मशागतीपासून ते तोडणीपर्यंत मोठा खर्चही केला. वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ नये, म्हणून डोळ्यात तेल घालून जीव धोक्यात घालून पिकांची राखणी केली. यामुळे लागवड क्षेत्र टोमॅटोच्या लालीने बहरून गेले. दोन पैसे पदरात पडतील या आशेने टोमॅटोची तोडणी केली; मात्र बाजारात विक्रीसाठी दाखल करताच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले.
कष्ट करून पिकविलेल्या टोमॅटोला पाच रुपये, दहा रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळत आहे. कवडीमोल भावात विक्री करावी लागत असल्याने, शेती करावी तर कशी असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. एकीकडे निसर्गाचे संकट, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव, वन्यप्राण्यांचा त्रास असताना, दुसरीकडे मात्र पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून टोमॅटोची लागवड केली; परंतु ऐन हंगामात भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी दादाजी माळी यांनी केली आहे.
यंदा बाजारभावच नाही
सध्या सर्वेच भाजीपाला पिकांना भाव चांगले मिळत आहे, परंतु टोमॅटो उत्पादन आवक वाढल्यामुळे बाजार भाव घसरले असल्याचे साक्री येथील व्यापारी दिलीप बागुल यांनी सांगितले. शेतकरी संभाजी खैरनार, म्हणाले की, फेब्रुवारी ते मार्च या काळातील टोमॅटो लागवड करण्यासाठी सुरुवातीला ट्रॅक्टरने उभी आडवी खोल नांगरट करावी लागते. महिनाभर जमीन चांगली तापल्यानंतर जमिनीची पोत चांगला सुधारतो. एप्रिल महिन्यात टोमॅटोला चांगला भाव मिळतो, या आशेने टोमॅटो लागवड केली आहे, परंतु यावर्षी टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे.
असे आहेत टोमॅटोचे दर
आज सर्वसाधारण टोमॅटोला क्विंटलला सरासरी 700 रुपये ते 1150 रुपये दर मिळाला. हायब्रीड टोमॅटोला 1015 रुपये दर मिळाला. लोकल टोमॅटोला 500 रुपयांपासून ते 1300 रुपयांपर्यंत दर मिळाला. नंबर एकच्या टोमॅटोला 1100 रुपयापासून ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. टोमॅटोच्या वैशाली वाणाला 800 रुपये ते 1350 रुपये दर मिळाला.