Tomato Market :टोमॅटोची आवक घटली असून नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मार्केट यार्डमध्ये व्यापारी ट्रक भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एरवी काही तासांत भरणारे ट्रक आता दोन-दोन दिवस उभे असल्याचे दिसून आले. त्यामुळे व्यापारी माल मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर पुढील काळात बाजारभाव टिकून राहणार असल्याचे बाजार समित्यांच्या सूत्रांकडून समजते आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड केली जाते. त्यातही टोमॅटोची सर्वाधिक लागवड (Tomato Cultivation) केली जाते. टोमॅटो पिकावर शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे अर्थकारण अवलंबून असते. जिल्ह्यातील कांदा आगार असलेल्या पिंपळगाव, लासलगाव, चांदवड, येवला, पश्चिम पट्ट्यातील गिरणारे, सिन्नर परिसरात टोमॅटोची लागवड होत आहे. जिल्ह्यातील काही भागात टोमॅटोची काढणी सुरु झाली आहे, तर काही भागात फुल अवस्थेत झाडे आहेत. अशा स्थितीत सप्टेंबरच्या शेवटी झालेल्या जोरदार पावसामुळे टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. तर काढणीला आलेल्या पिकांवरही परिणाम झाल्याने आवक घटल्याचे चित्र आहे.
पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केट यार्ड दररोज 30 ते 40 हुन अधिक वाहनांची रीघ लागते. मात्र गेल्या दोन-चार दिवसांपासून खूपच कमी शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र आहे. खरेदीसाठी अनेक व्यापारी येऊन थांबले आहेत. मात्र आवक कमी असल्याने 2-2 दिवस ट्रक भरत नसल्याचे व्यापारी वर्गाकडून समजले. आजमितीस अनेक ट्रक पिंपळगाव बसवंत मार्केट यार्डात उभे आहेत.
एक व्यापारी म्हणाला की, ट्रकमध्ये जवळपास 480 कॅरेट माल बसतो. साधारण चार-पाच शेतकऱ्यांची वाहने मिळून एखाद ट्रक भरतो. मात्र या आठवड्यात आवक कमी असल्याने दोन-दोन दिवस वाट पहावी लागत आहे. त्यामुळे व्यापारी माल मिळण्याच्या आणि ट्रक भरण्याच्या प्रतिक्षेत आहेत. शिवाय माल भरण्यासाठी मजुर सोबत असल्याने हे मजूर अंगावर पडत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आवकेमध्ये 7.3 टक्क्यांची घट
पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय लोंढे म्हणाले, काही दिवसांपासून टोमॅटोची आवक घटली आहे. तर बाजारभाव समाधानकारकअसून पुढील काळात बाजारभाव टिकून राहणार असल्याची शक्यता आहे. काल ३ ऑक्टोबर रोजी ४९ हजार क्विंटल आवक झाली. तर सरासरी ११०० रुपयांचा दर प्रति कॅरेटला मिळाला. तर बाजारभाव अहवालानुसार साधारण 15 सप्टेंबर पासून टोमॅटोची आवक घटली असून त्याच तारखेपासून बाजारभावात तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. आठवड्यापासून बाजारभाव सहा टक्क्यांची वाढ झाली तर आवकेमध्ये 7.3 टक्क्यांची घट झाल्याचं बाजार अहवालातून समोर आला आहे.