अमरावती : उत्पादनात कमी आल्याने तुरीचे भाव वधारले आहेत. हरभऱ्याचीही चमक वाढली आहे. त्याचवेळी सोयाबीनच्याही उत्पादनात कमी आलेली असताना भाव मात्र वर्षभर हमीभावाच्या आत आहे. त्यामुळे तूर, हरभरा शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता रब्बीचा गहूदेखील हमीभावाच्या पार गेला असल्याचे दिसून येते.
गतवर्षीच्या खरिपात अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार वगळता सर्वच तालुक्यांत पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. त्यामुळे मूग व उडीद बाद झाले, शिवाय तूर, सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनात कमी आली. त्यामुळे मागणी वाढली. मात्र, तुरीचेच दर हमीभाव ७००० असताना सध्या क्विंटलमागे १२ हजारांच्या वर पोहोचले आहेत. कापसाचा हमीभाव सात हजार असताना आता ६५०० रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला, त्यातुलनेत अलीकडे एक हजारांनी भाव वधारले आहेत.
तर तूरडाळ आतापासूनच १६० रुपये किलो झाली आहे, तर हरभऱ्याची डाळदेखील वधारली आहे. सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात कमी आली आहे. तरीही सोयाबीनची दरवाढ झालेली नाही. हमीभाव ४६०० रुपये असताना सोयाबीन ४२०० ते ४४०० रुपयांच्या दरम्यानच राहिले आहे. आता कुठे ४६०० वर पोहोचले आहे. त्यामुळे सोयाबीनचा उत्पादनखर्चही पदरी पडला नाही. निवडणूक पश्चात सोयाबीनची अंशतः दरवाढ होण्याची शक्यता आहे.
हरभऱ्याची दरवाढ, हमीभाव पार
वर्षभर हरभऱ्याचे दर क्विंटलमागे ५५०० रुपयांच्या दरम्यान राहिले. हमीभाव ५४४० रुपये असताना आता सहा हजार रुपयांच्या पुढे पोहचले. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. यंदा नाफेडचे दर, खासगी बाजाराचे दर यामध्ये १०० रुपयांचा फरक होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी बाजारात हरभरा विकला. आता पुन्हा थोडीफार तेजी येण्याची शक्यता आहे.
काही दिवसातील बाजारभाव
मागील काही दिवसातील हरभऱ्याचे भाव पाहिले असता 2 एप्रिल रोजी कमीत कमीत 5 हजार 300 रुपये तर सरासरी 5 हजार 600 रुपये, 4 एप्रिल रोजी कमीत कमी 5 हजार 500 तर सरासरी 5 हजार 800 रुपये, 06 एप्रिल रोजी कमीत कमी 5 हजार 700 तर सरासरी 6 हजार 100 रुपये, 08 एप्रिल रोजी कमीत कमी 5 हजार 800 तर सरासरी 6 हजार रुपये, 12 एप्रिल रोजी कमीत कमी 5 हजार 800 रुपये तर सरासरी 6 हजार 350 रुपये, 14 एप्रिल रोजी कमीत कमी 5 हजार 800 तर सरासरी 6 हजार 165 रुपये असा भाव मिळाला.