- गोपाल व्यास
जळगाव : कापसाच्या पिकात (Cotton Crop) दुय्यम पीक म्हणून तूर लावली जाते. आज हीच तूर (Tur) अव्वल ठरत असून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देत आहे. बाजारात कापसाला सध्या ७ हजार १२१ रुपये तर तुरीला ७ हजार ५५० प्रतिक्विंटल असा हमीभाव आहे. खुल्या बाजारात तर हमीभावापेक्षा बाजी मारत तूर १२ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल रुपये विकली जात आहे.
नगदी पीक म्हणून कापसाकडे (Cotton Market) पाहिले जाते. त्यामुळे कापसाची सर्वात जास्त लागवड केली जाते. असे असले तरी तुरीच्या भावाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. खरीप हंगामात कापूस (Kharif Season) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर मका, ज्वारी, सोयाबीन या पिकाचा नंबर लागतो. त्यात दुय्यम स्थान मात्र तूर, उडीद, मूग या डाळींना दिले जाते. पहिल्या पसंतीच्या कपाशीला शासनाकडून हमीभाव दिला जात आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत मात्र दाम मिळत नाही, पण दुय्यम पीक म्हणून लावण्यात येत असलेली तूर मात्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
गेल्या वर्षी कापसाचा भाव आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला. तर तुरीने मात्र १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर काही दिवसांपासून टिकवून ठेवला आहे. शासनाने नुकतीच १९ जून रोजी खरीप हंगामपूर्व पिकाची आधारभूत किंमत जाहीर केली आहे. यात मागील वर्षी असलेल्या कापसाचा हमी भाव ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलवरून ७ हजार १२१ रुपये प्रति क्विंटल केला आहे. कापसात ८०० रुपयांची वाढ झाली तर त्याउलट गेल्या वर्षी ६ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असलेली तूर यावर्षी ७ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल झाली. विशेष म्हणजे हमीभावापेक्षाही तूर दुप्पट दराने म्हणजे १२ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे विकली गेली. तर हमीभाव वाढल्याने तूर यंदा १३ हजार ते १४ हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
कापसाचे उत्पादन घटले, म्हणून तुरीला मागणी
बोदवड येथील धान्य व्यापारी पवन अग्रवाल म्हणाले की, कापसाचे उत्पादन घटत असल्याने तुरीला मागणी आहे. त्यामुळे भाव चांगला आला आहे. सध्या तरी तुरीचा दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे. तर तूर पीक घेणे केव्हाही चांगले. कारण, मजुरीमुळे कापूस आता परवडत नाही. शासन कापसाला भाव देत नाही. बाजारातही भाव मिळत नाही. त्यातच बोंडअळी पिच्छा सोडत नाही. फवारणीचा खर्च प्रचंड आहे. सद्यःस्थितीत तरी कापसापेक्षा तुरीला चांगला भाव मिळत असल्याचे मत सोसायटी चेअरमन पंकज सोमाणी यांनी व्यक्त केले.
अपेक्षित भाव नाही आणि अपेक्षित उत्पन्न नाही. त्यामुळे सध्या कापूस परवडत नाही. त्यामुळे तूर हाच त्यावर पर्याय आहे. तुरीला यंदा चांगली मागणी आहे. आपण स्वतः यापूर्वी कपाशी लावली होती. यंदा २५ एकर क्षेत्रात तूर लावली आहे. दोनच दिवसांपूर्वी तूर पेरली आहे. तुरीचा पालापाचोळा खाली पडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.- दिनेश पाटील, शेतकरी जामनेर.