भंडारा : गतवर्षी पावसाळ्याला ११ हजारांचा पल्ला गाठलेल्या तुरीला यंदा एप्रिल महिन्यात हमीभावापेक्षा (Tur MSP) केवळ ५० रुपये अधिक भाव मिळतो आहे. शासनाने तुरीसाठी ७५५० रुपयांचा हमीभाव ठरविला आहे. सध्या तुरीचे उत्पादन (Tur Production) हाती आल्याने बाजार समित्यांमधून ७६०० रुपयांचा भाव मिळतो आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती 'तुरी' मिळत असल्याची नाराजीची भावना व्यक्त होत आहे.
व्यापारी म्हणतात, तूर्तास भाववाढ नाही
तुरीला तरी गतवर्षीप्रमाणे भाव मिळेल, असे वाटले होते; परंतु, यंदा सरासरी ७ हजार ६०० रुपयांवर तुरीची विक्री होत आहे. शिवाय येणाऱ्या दिवसांतही भाव वाढण्याची (Tur Market) शाश्वती व्यापारी देत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो आहे.
खरिपाप्रमाणे रब्बीतही शेतकऱ्यांची कोंडी
यंदा खरीप हंगामात शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. नदी, नाल्यांकाठची पिके तर जमिनीसह खरवडून गेले. रब्बीतही कीड व रोगांमुळे उत्पादनात घट झाली. जिल्ह्यात महिनाभरापासून बहुतांश भागात सुरू असलेले गहू व हरभरा काढणीचे काम पूर्ण झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कडधान्यांची आवक होत आहे. एकाच वेळी आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कडधान्य उत्पादनात ३० टक्क्यांची घट
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा कडधान्य उत्पादनात जवळपास २५ ते ३० टक्के घट झाली आहे. कीड व रोगामुळे उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे किमान गतवर्षीप्रमाणे यंदा भाव तरी समाधानकारक मिळावा, अशी आशा आहे. मात्र, सध्या बहुतेक कडधान्यांना हमीभावापेक्षा अधिक दर मिळत नसल्याचे चित्र आहे.
हमीभावापेक्षा कमी दर
शासनाने रब्बी हंगामात निघणाऱ्या शेतमालाचे हमीभाव ठरविले आहेत. हरभऱ्यासाठी ५६५० रुपये, मूग ८६८२ रुपये, उळीद ७४०० रुपये, गहू २४२५ रुपये असे हमीभाव आहेत. परंतु, सध्या गव्हाला २९०० व तुरीला ७६०० ते ७७००, मूग ६५००, उडीद ६६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात आहे. कडधान्य हमीभावापेक्षा कमी दरात विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. पंधरवड्यापासून हरभऱ्याची ५ हजार ५५० ते ५ हजार ६०० रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे.
बाजारातील आवकेनुसार भाव ठरत असतात. सध्या मार्केटमध्ये कडधान्यांची आवक सुरू आहे.
- सागर सार्वे, सचिव बाजार समिती, भंडारा.