Tur Soyabean Market : माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष मार्च (१९ मार्च २०२५) मधील तुरीची (Tur Market) आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे. मार्च २०२५ मध्ये ९.३ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत १२.०० लाख टन होती.
तूर हे खरीप पिक (Kharip Crops) असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.०२ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन १०.१० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये १२.६० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर २०२४ पासून तुरीच्या किंमती कमी होत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या एप्रिल मधील सरासरी किंमती एप्रिल २०२२ मध्ये ६ हजार १९२ रुपये प्रति क्विंटल, एप्रिल २०२३ मध्ये ८ हजार ४१४ रुपये प्रति क्विंटल, एप्रिल २०२४ मध्ये १० हजार ०.७१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता.
निर्यात वाढलेली आहे. यंदाच्या एप्रिल २०२५ मध्ये ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपये असा दर मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या हंगामासाठी सरकारने खरीप २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (७५५० रुपये क्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती कमी आहेत. मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयात कमी झालेली आहे तर निर्यात वाढलेली आहे.
सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील.... तर सोयाबीनच्या बाबतीत अमेरिकन कृषी विभागाच्या, (USDA, मार्च. २०२५) अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये, जगात ४२०७ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ६.४ टक्केनी (३९४९ लाख टन, २०२३-२४) अधिक आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी मार्च महिन्यात सोयाबीनची मासिक आवक कमी झाली.
सन २०२३-२४ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत्त वाढ झाली आहे. चालू वर्षी एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ मध्ये १९.४० लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील (१९.३४ लाख टन) निर्यातीपेक्षा अधिक आहे. सन २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत रु. ४८९२ प्रती क़्विटल आहे.
असे राहतील सोयबिनचे दर मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील एप्रिल महिन्यातील सरासरी किंमती पुढीलप्रमाणे होत्या, त्यानुसार एप्रिल २०२२ मध्ये ७ हजार २८९ रुपये प्रति क्विंटल, एप्रिल २०२३ मध्ये ५१५२ रुपये प्रति क्विंटल, एप्रिल २०२४ मध्ये ४५९६ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तसेच यंदा एप्रिलमध्ये ४ हजार रुपये ते ४४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे.