अकोला : सध्या सोयाबीनला अपेक्षित हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्याचबरोबर यंदा नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात देखील घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे एकीकडे सोयाबीनवर केलेला खर्च आणि आता बाजारात मिळत असलेला भाव याचं गणित काही जुळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च सुद्धा मिळणे मुश्किल झाल्याने शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त होते आहे.
देशभरासह महाराष्ट्रातील महत्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड करण्यात आली. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. आता उत्पादन हाती लागले असताना भाव वाढत नसल्याने सोयाबीन घरात पडून आहे. सद्य:स्थितीत सोयाबीनला साधारण सरासरी ४३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सुरुवातीला कमी पाऊस, त्यानंतर पावसाचा खंड, येलो मोड़ोंक व विविध रोगराईच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यानंतर कसेबसे काही प्रमाणात सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात आले आहे. परंतु, यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने घरात पडून आहे. पिकावर झालेला खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
नेमका एकरी सोयाबीनला खर्च किती?
पणजीसाठी 700 रुपये, चाई 500 रुपये, ट्रॅक्टरचा खर्च 600 रुपये, सोयाबीनची बॅग 2700 रुपये, पेरणीचा खर्च 500 रुपये, तणनाशकाचा फवारा 1000 रुपये, कीटकनाशकाचा फवारा 800 रुपये, सोंगणीचा खर्च 2800 रुपये, काढणीचा खर्च 250 रुपये, पोते घरी आणण्याचा ट्रॅक्टरचा खर्च 500 रुपये अशा पद्धतीने एकरी सोयाबीनला खर्च येत असतो.
खर्चही निघेल की नाही? शेतकरी म्हणतात?
यावर्षी उत्पन्नात मोठी घट आली आहे. तसेच दरातसुद्धा मोठी घसरण झाल्याने पिकावर झालेला खर्चही निघेल की नाही, वा विवंचनेत शेतकरी आहे. बहुतांश शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत आहेत. शेतकरी रवी घरडे सध्याच्या काळात शेती करणे खूप कठीण झाले आहे. वातावरणही साथ देत नाही. शेतीसाठी खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. अशातच सोयाबीनला भाव कमी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकरी हरिदास माने म्हणाले की २००८ मध्ये सोयाबीनला ४३०० रुपये भाव होता व २०२४ मध्येही तोच भाव मिळतो. त्यामुळे सोयाधीन उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन सोयाबीनला चांगला भाव मिळवून द्यावा. संजू उजाडे म्हणाले की, सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कमी पाऊस व विविध प्रकारच्या रोगराईमुळे उत्पन्न कमी झाले आहे. त्यातच भाव नसल्याने सोयाबीन घरात पडून असल्याचे ते म्हणाले.