नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो. त्या खालोखाल टोमॅटो आणि इतर भाजीपाला वर्गीय पिके घेतली जातात. लासलगाव बाजारपेठ प्रामुख्याने कांदा लिलाव होत असतात. याच परिसरात असलेल्या निफाड बाजार समितीच्या उपबाजार समितीत आता भाजीपाला लिलाव देखील सुरु झाले आहेत. त्यामुळे आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड करण्यात येते. साधारण पंधरा बाजार समित्यांमध्ये कांदा पिकासह काही इतर पिकांचे लिलाव करण्यात येतात. तर नाशिकसारख्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव देखील होत असतात. त्यामुळे अनेकदा लासलगाव, निफाड परिसरातील शेतकरी हे भाजीपाला थेट नाशिक बाजार समितीत घेऊन येत असतात. मात्र आता निफाड बाजार समितीचे उपबाजार आवारात भाजीपाला लिलाव सुरु करण्यात आले आहे. या भाजीपाला लिलावाचा शुभारंभ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे, संचालक भिमराज काळे, जयदत्त होळकर, संदीप दरेकर, छबुराव जाधव, राजेंद्र डोखळे, ज्ञानेश्वर जगताप, डॉ. श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, पंढरीनाथ थोरे, सचिव नरेंद्र वाढवणे इत्यादी उपस्थित होते.
असा मिळाला बाजारभाव
दरम्यान आजच्या लिलावात कोथिंबीरच्या जवळपास 1100 जुड्यांची आवक झाली होती. कोथिंबीरीला शेकडा कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मेथीला शेकडा कमीत कमी 725 रुपये तर सरासरी पंधराशे रुपये इतका दर मिळाला. घेवड्याला प्रतिक्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे पन्नास तर सरासरी 36 रुपये इतका दर मिळाला वांग्याच्या कॅरेट ला कमीत कमी 248 रुपये तर सरासरी 690 रुपये इतका भाव मिळाला. शिमला मिरचीला करेट्स ला सरासरी 500 रुपये भाव मिळाला. कोबीला प्रतिक्विंटल कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी 900 रुपये इतका भाव मिळाला. टोमॅटोला कमीत कमी पन्नास रुपये तर सरासरी 221 रुपये कॅरेटचा भाव मिळाला. फ्लावरला प्रत्येक क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये तर सरासरी 1750 रुपये इतका भाव मिळाला. चवळीला कमीत कमी चार हजार रुपये तर सरासरी देखील चार हजार रुपये भाव मिळाला.