नाशिक : गेल्या काही वर्षांत शहरातील बाजार व्यवस्था बदलली असली तरी ग्रामीण भागात अजूनही आठवडे बाजाराचे महत्त्व टिकून आहे. स्वयंरोजगाराचे साधन म्हणून या बाजारांनी अनेकांच्या जीवनाला आर्थिक आधार दिला आहे. ग्रामीण भागात आजही नवीन आठवडे बाजार भारत असल्याने परिसरातील भाजीपाला उत्पादक, अल्पभूधारक शेतकरी, छोट्या व्यावसायिकांसाठी स्वयंरोजगार निर्मितीचे केंद्रच ठरत आहे.
गेल्या काही वर्षांतील माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे ई कॉमर्ससारख्या बाजारपेठेत आपण घरबसल्या अनेक वस्तू खरेदी करू शकतो व विकूही शकतो. मात्र, या बदलत्या परिस्थितीतही ग्रामीण भागातील आठवडे बाजारांनी आपले वेगळेपण जपले आहे. काही वर्षापूर्वी तालुक्याला किंवा मोठ्या गावांना भरणारे आठवडे बाजार आता गावागावात भरू लागल्याने या परिसरातील शेतकऱ्यांसोबत व्यावसायिकांच्या दृष्टीनेदेखील स्वयंरोजगार निर्मितीचे केंद्रच ठरू लागले आहेत. कळवण तालुक्यातील चार ते पाच हजार लोकवस्ती असलेल्या बारा ते तेरा गावांमध्ये काही वर्षांत आठवडे बाजार सुरू करण्यात आले व ते मोठ्या स्वरूपात भरू लागले आहेत. हे आठवडे बाजार या परिसरातील चार पाच गावांना मध्यवर्ती ठरत असून, शेतकरी या बाजारपेठेत शेतमाल घेऊन येतात.
तसेच तालुक्यातील इतर छोट्या - मोठ्या व्यावसायिकांना देखील बाजारपेठ सोयीची झाली आहे. सुरुवातीला या बाजारातून चाळीस ते पन्नास हजार रुपयांची उलाढाल होत होती. ती आता एक ते दीड लाख रुपयांवर पोहोचली आहे. बाजाराच्या दिवशी चार ते पाच हजार ग्राहक आणि दोनशे ते अडीचशे विक्रेते असतात. गाव- खेड्यांतील या बाजारांमध्ये तालुक्यातून विक्रेते देखील बाजारात खरेदी विक्री करू लागले आहेत. गावात रविवारी आठवडे बाजार भरविण्याची संकल्पना सुचल्यानंतर प्रवीण जाधव, रवींद्र वाघ, उत्तम मोरे, दादाजी जाधव, सुनील जाधव, राहुल आहेर, मंगेश आहेर, राहुल सूर्यवंशी, ललित वाघ, हंसराज वाघ, योगेश जाधव यांनी प्रत्यक्षात आठवडे बाजार भरवला.
या वस्तूंची उपलब्धता
शेतमालाव्यतिरिक्त बाजारपेठेत कपडे, साड्या, भांडी, किराणा, स्टेशनरी, कटलरी साहित्य, शेती अवजारांमध्ये खुरपे, कुन्हाड, घमेले, कुदळ, फावडे बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. मातीच्या कुंड्या, रांजण, माठ, सौंदर्यप्रसाधने, टोपल्या, धान्य अशा वस्तूंचीही खरेदी-विक्री होते. भाजीपाल्यामध्ये बटाटा, कोबी, भेंडी, दोडके, टोमॅटो, घोसाळे, फ्लॉवर, वांगी, वाल, कारले, वाटाणा, शेवगा, करडी, मिरची, लिंबू, सिमला मिरची, काकडी, गाजर, मेथी, कोथिंबीर आदी शेतमाल विक्रीला येतो.
ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल
भाजीपाला विक्रेते संजय बागुल म्हणतात की, सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तू विक्रीचे हक्काचे व्यासपीठ म्हणून बाजार विकसित झाला आहे. अलीकडच्या काळात ग्राहकांच्या गरजेनुसार बाजाराचे स्वरूपही बदलत आहे. सुरुवातीपासून या आठवडे बाजारात शेतीमाल विकत आहे. तर दादाजी जाधव म्हणतात की, कळवणच्या आठवडे बाजारानंतर सर्वात मोठा आठवडे बाजार पिळकोस येथे भरू लागला आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत आहे. आता गावात पुढील काळात यात्रोत्सव भरविण्याचा संकल्प असून, त्या दिशेने वाटचाल व नियोजन सुरू आहे.