यवतमाळ : दररोजच्या जेवणातील लाल मिरची (Red Chilli) प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे. गेल्यावर्षी मिरचीचे दर आकाशाला भिडले होते. यावर्षी मिरचीचा हंगाम सुरू झाला आहे. याचवेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाल्याने मिरचीचे दर गडगडले आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, हैदराबादमध्ये मिरची उत्पादकांना जबर नुकसानीचा सामना करावा लगत आहे. यातच तेल कंपन्यांनी मिरची खरेदीकडे पाठ फिरविल्याने स्थिती अधिकच बिकट झाली आहे. गेल्यावर्षी २० हजार रुपये क्विंटल असलेली लवंगी मिरची १० ते १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आली आहे.
जिल्ह्यात गुंटूरचा बोलबाला
लगतच्या आंध्र प्रदेशातून गुंटूर मिरची जिल्ह्यात दाखल होते. इतर मिरचीपेक्षा ही मिरची अधिक तिखट आणि वाजवी दरात आहे. यामुळे या मिरचीच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटमध्ये दिलासा मिळणार आहे.
दर का उतरले?
* मागीलवर्षी शेतकऱ्यांनी (Farmer) मिरचीची मोठी लागवड केली. ही मिरची आता बाजारात आली आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मिरची बाजारात असल्याने मिरचीचे दर दबावाखाली आले आहे.
* याशिवाय खरेदी करणाऱ्या मिरची कंपन्याची संख्या बाजारात कमी झाली आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे.
* मिरचीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यासोबतच मोठ्या व्यावसायिकांनाही आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
बाजारात मिरची खरेदी करणाऱ्या तेल कंपन्या नाही. याशिवाय मिरचीचे मोठे उत्पादनही बाजारात आहे. याचा परिणाम मिरचीचे दर घसरण्यावर झाला आहे. साठवणूकदारांना याचा मोठा फटका बसला आहे. - गोपाल अग्रवाल, व्यापारी.
कोणत्या मिरचीचे काय दर
मिरची | किमान | कमाल | गतवर्षीचा |
गुंटूर | १५० | २०० | २५० |
लवंगी | १०० | १५० | २०० |
सी ५ | १२० | १५० | २८० |
गावरान | ८० | १७० | २०० |
हे ही वाचा सविस्तर : Turmeric Market: हळदीच्या दरात आली तेजी; असे वधारले दर वाचा सविस्तर