पुणे : उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे लिंबाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस आणली आहेत.
दरात लिंबांच्या गोणीमागे ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसामुळे लिंबांचे नुकसान होत असून, शेतकऱ्यांनी लिंबांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू केली आहे.
अवकाळी पाऊस, तसेच हवामान बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. आठवड्यापूर्वी तेजीत असलेल्या लिंबांच्या दरात घट झाली. आहे. घाऊक बाजारात सध्या प्रतवारीनुसार लिंबांच्या एका गोणीला ३०० ते १३०० रुपये दर मिळत आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.
मार्केट यार्ड घाऊक बाजारात सध्या दररोज दीड ते दोन हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. आठवड्यापूर्वी किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री पाच ते दहा रुपयांना करण्यात येत होती. आवक वाढल्याने लिंबांच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात घट झाली आहे.
सध्या बाजारात विक्रीस पाठविण्यात येणारी लिंबे आकाराने लहान आणि हिरवी आहेत. लिंबांची प्रतवारी फारशी चांगली नसल्याने दरही कमी मिळाले आहेत. उन्हाळ्यात आंबट लिंबांना चांगले दर मिळतात.
हैदराबाद, चेन्नईहून लिंबांची आवक
राज्यात प्रमुख बाजारात सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकरी लिंबे विक्रीस पाठवितात. त्याचबरोबर हैदराबाद, चेन्नई परिसरातील शेतकऱ्यांनी ही महाराष्ट्रातील बाजारात लिंबे मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविली आहेत.
अवकाळी पावसामुळे लिंबूचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लिंबे विक्रीस पाठविली आहेत. हवामान बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. बाजारात आवक झालेली लिंबे कच्ची आणि रंगाने हिरवी आहेत. कच्च्या लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. १५ किलो लिंबांचे दर प्रतवारीनुसार ३०० ते १३०० रुपयांपर्यंत आहेत. लिंबांच्या गोणीच्या दरात ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली आहे. - रोहन जाधव, लिंबू व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड